रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचं युद्ध सुरूच असून रशियन सैन्य युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. अशातच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी पहाटे ऑनलाइन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये रशियन सैन्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
झेलेन्स्की म्हणतात की, “युक्रेनियन लोकांच्या वतीने, मी तुम्हाला एक संधी देतो. जर तुम्ही आमच्या सैन्याला शरण आलात, तर आम्ही तुमच्याशी सभ्यतेने वागू आणि तुम्हाला चांगली वागणूक देऊ. रशियाने युद्धात आधीच ९० लढाऊ विमानं गमावली आहेत आणि रशियन सैन्याने आमच्याकडून अशा प्रत्युत्तराची अपेक्षा केली नव्हती. त्यांनी आमच्याबद्दल अनेक दशकांपासून जो खोटा प्रपोगंडा पसरवला जात आहे, त्यावर विश्वास ठेवला”, असं ते म्हणाले.
झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला आत्मसमर्पण करण्याचा प्रस्ताव देण्याची पहिलीच वेळ नाही. दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी रशियन सैनिकांनी आत्मसमर्पण केल्यास रोख रक्कम आणि माफीची ऑफर दिली होती.शनिवारी झेलेन्स्की म्हणाले की, हजारो रशियन सैनिक एकतर पकडले गेले आहेत किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
“आम्ही रशियन लोकांबद्दल कृतज्ञ आहोत, ज्यांनी युद्धात रशियाने दिलेल्या चुकीच्या माहिती विरोधात लढा दिला,” असं ते म्हणाले.
काही रशियन सैनिक आपली शस्त्र सोडून देत युद्धक्षेत्रातून पळून जात आहेत. रशियन सैन्य हे खरं तर आमच्या सैन्याला उपकरणे पुरवणाऱ्यांपैकी एक आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला. तसेच तुम्ही का मरायला हवं, असा सवाल झेलेन्स्की यांनी रशियन सैनिक आणि अधिकारी यांना केला आहे.