युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या संघटनेचा नेता अनुप चेटिया हा वीस वर्षे फरार होता त्याला बांगलादेशने भारताच्या ताब्यात दिले असून सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी चेटियाला ताब्यात दिल्याबद्दल शेख हसीना वाजेद यांचे आभार मानले आहेत. मुंबईतील कुख्यात गुंड छोटा राजन याला इंडोनेशियाकडून ताब्यात घेतल्यानंतर भारताला मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. चेटिया ( वय ४८) हा उल्फाचा संस्थापक सरचिटणीस असून तो अपहरण, बँक दरोडे व खंडणी प्रकरणात हवा होता. त्याचे मूळ नाव गोलाप बारूआ असून त्याला बांगलादेशने आज सकाळी भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. भारताने चेटियाला ताब्यात देण्याची मागणी अनेकदा केली होती पण बांगलादेशातील आतापर्यंतच्या सरकारांनी त्यात सहकार्य केले नव्हते.

Story img Loader