२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दवा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने उलट्या बोंबा ठोकत मुंबई हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. १६४ निष्पापांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मुंबईवरील २६/११ हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा आपण तीव्र निषेध व्यक्त करीत असल्याचे सईदने पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या वक्तव्यावरून सईदचा दुतोंडीपणा ठसठशीतपणे समोर आला आहे. माझा या हल्ल्यात सहभाग नव्हताच आणि भारत माझ्याविरोधातील आरोप सिद्ध करू शकणार नाही, असा दावा देखील हाफिजने केला आहे. तसेच मुंबईत दहशतवादी हल्ल्यासाठी भारताने माझ्यावर आरोप केले. मी त्यावेळी तातडीने स्थानिक प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून या हल्ल्याशी संबंध नसल्याचे तात्काळ स्पष्टीकरण दिले होते, असेही तो पुढे म्हणाला.
दरम्यान, भारताने याआधीच हाफिज सईदविरोधात सर्व पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहेत. एवढेच नाही तर मुंबईवर हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब व नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये जिवंत पकडले गेलेले मोहम्मद नावेद, सज्जाद अहमद या पाकिस्तानी दहशतवाद्यांनीही हाफिज सईदच्या दहशतवादी कारवायांमधील सहभागाविषयीची माहिती उघड केली आहे. मात्र त्यानंतरही हाफिज सईद पाकमध्ये छातीठोकपणे आपण काहीच केले नसल्याचा दावा करीत मोकळा फिरत आहे.

Story img Loader