Sanjauli Masjid Controversy: हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील संजौली मशिदीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी संजौली मशिदीचा प्रश्न खूप गंभीर झाला होता, तो आता पुन्हा डोके वर काढत आहे. दरम्यान संजौली मशिदीतील बेकायदेशीर बांधकामाबाबत सिव्हिल सोसायटी आणि देवभूमी संघर्ष समितीने शिमला महानगरपालिकेला निवेदन सादर केले आहे. या प्रकरणी १५ दिवसांच्या आत कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यामध्ये पुढे म्हटले आहे की, चार महिन्यांपूर्वी महानगर न्यायालयाने संजौली येथील मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते, परंतु ४ महिने उलटूनही या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही.
सिव्हिल सोसायटी आणि देवभूमी संघर्ष समितीने सादर केलेल्या निवेदनात असा इशारा देण्यात आला आहे की, जर महानगरपालिकेने या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही तर त्यांच्याकडून मोठे आंदोलन उभारले जाईल. या प्रकरणात देवभूमी संघर्ष समितीने स्पष्टपणे म्हटले आहे की, जर मशिदीत केलेले बेकायदेशीर बांधकाम १५ दिवसांत पाडले नाही तर संजौली बाजार बंद करून मोठे आंदोलन केले जाईल आणि यासाठी महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल.
मशिदीचे तीन मजले पाडण्याचे आदेश
गेल्या वर्षी, या प्रकरणी वाद वाढल्यानंतर, शिमला महानगरपालिका आयुक्तांच्या न्यायालयाने या मशिदीचे तीन मजले बेकायदेशीर असल्याने ते पाडण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या न्यायालयाने वक्फ बोर्ड आणि मशीद समितीच्या अध्यक्षांना दोन महिन्यांत या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते.
गेल्या वर्षी आंदोलनात १० जण जखमी
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, मशिदीतील बांधकाम बेकायदेशीरपणे करण्यात आले आहे. हिमाचल काँग्रेस सरकारमधील मंत्री अनिरुद्ध सिंह यांनी विधानसभेत, परवानगीशिवाय मशिदीत अतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचे सांगितले होते, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. गेल्या वर्षी १२ सप्टेंबर रोजी मशिदीचे बेकायदेशीर भाग पाडण्याच्या मागणीसाठी एक मोठे आंदोलन झाले होते. त्यामध्ये १० लोकं जखमी झाली होती.
महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवण्यावरून वाद
याशिवाय, हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथे आणखी एक वाद सुरू आहे. तिथे मशिदीसमोर महाराणा प्रताप यांच्या पुतळा बसवण्यासाठी मुस्लिम समुदाय विरोध करत आहे. मुस्लिम समुदायाचे म्हणणे आहे की, मशिदीसमोर पुतळा बसवल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. या संदर्भात, मुस्लिम सुधार सभेच्या सुजानपूरच्या शिष्टमंडळाने हमीरपूरच्या उपायुक्तांची भेट घेतली आहे. उपायुक्तांनी हे प्रकरण पुढील कारवाईसाठी उपविभागीय दंदाधिकारी सुजानपूर यांच्याकडे पाठवले आहे.