उमा भारती, सीतारामन, कलराज मिश्रा यांच्यासह सहा मंत्र्यांचे राजीनामे? उद्या फेरबदल होण्याची चिन्हे

कौशल्य विकास खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राजीव प्रताप रूडी यांनी गुरूवारी रात्री राजीनामा देऊ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामधील बहुचर्चित फेरबदल उद्या (शनिवार, दि. २) सायंकाळी किंवा रविवारी (दि. ३) सकाळी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. केवळ रूडी यांनीच राजीनामा देऊ केला असला तरी गुरूवारी दिवसभरात अन्य सहा मंत्र्यांकडून राजीनामा घेतल्याची चर्चा होती. त्यामध्ये कलराज मिश्रा, उमा भारती, निर्मला सीतारामन, गिरीराजसिंह, डॉ. संजीव बालियान, फग्गनसिंह कुलस्ते आदींचा समावेश असल्याचे विश्व्सनीय सूत्रांनी सांगितले. तसेच मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यातच जमा आहे.

गुरूवारी सकाळपासून पक्षाध्यक्ष अमित शहा विविध मंत्र्यांना भेटत होते. सकाळी झालेली बैठक गुजरात निवडणुकीच्या तयारीसाठी असली तरी त्यानंतर शहांना भेटलेल्या मंत्र्यांमध्ये लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री कलराज मिश्रा, कृषि राज्यमंत्री संजीव बालियान आणि लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरीराजसिंह आदींचा समावेश होता. उमा भारती या भेटल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, त्या तीन तारखेपर्यंत झांशीमध्ये असतील. पण त्यांनी प्रकृतीकारणास्तव राजीनामा देण्याची तयारी दाखविल्याचे समजते. वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या मिश्रांना राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मंत्र्यांना शहांनी राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार त्या मंत्र्यांनी एका तासाच्या आत आपले राजीनामे राष्ट्रीय संघटन मंत्री रामलाल यांच्याकडे सोपविले. रूडी यांचा राजीनामा अपेक्षित होता. एक तर पंतप्रधानांच्या प्राधान्याचे खाते असूनही त्यांना समाधानकारक कामगिरी करता आली नसल्याचा निष्कर्ष काढला जात होता. त्यातच बिहारमध्ये  गाजत असलेल्या सृजन गैरव्यवहारप्रकरणामधील रूडींच्या भूमिकेबद्दल चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाला स्थान द्यवे लागणार असल्याने बिहारमधील मंत्र्यांना कात्री लागणारच होती. त्यात पहिला बळी रूडींचा गेला आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे शुक्रवार व शनिवार तिरूपतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते शनिवारी दुपारी दिल्लीत परततील. तर पंतप्रधान मोदी रविवारी चीन व म्यानम्यारच्या दौऱ्यावर रवाना होतील आणि बुधवारी (दि. ६ सप्टेंबर) परततील. तोपर्यंत पितृपंधरवडा चालू झाला असेल. त्यानंतर नवरात्र. मध्येच २४ व २५ सप्टेंबरला भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीमध्ये विस्तारित बैठक आहे. त्यामुळे उद्या (शनिवारी) किंवा रविवारी तो झालाच नाही तर मंत्रिमंडळ फेरबदल थेट सप्टेंबरअखेरपर्यंत होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती भाजप मुख्यालयातील  सूत्रांनी दिली.

संरक्षण, शहरी विकास, माहिती व प्रसारण, वने व पर्यावरण यासारख्या  खात्यांचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे दिला असला तरी फेरबदलाच्या चर्चेने संसद अधिवेशन संपल्यापासून जोर आहे. संयुक्त जनता दल व अण्णाद्रमुक या नव्या मित्रांना स्थान व निवडणूक असलेल्या कर्नाटक व राजस्थानमधून काही चेहऱ्यांना संधी देण्यासाठी फेरबदल केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कामगिरी समाधानकारक नसल्याने काही मंत्र्यांना नारळ देण्याचीही चर्चा आहे.

संरक्षणमंत्रिपद सोडण्याचे अरूण जेटलींचे संकेत

संरक्षणमंत्रिपदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून लवकरच मुक्त होण्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटलींनी दिले. जेटली म्हणाले, ‘ही अतिरिक्त जबाबदारी आणखी फार काळ नसण्याची अपेक्षा आहे. पण अर्थातच ते काही मी ठरविणार नाही. जेटलींच्या या टिप्पणीने दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे अर्थमंत्रिपद त्यांच्याकडे राहील आणि देशाला लवकरच नवा संरक्षणमंत्री मिळेल.

 

Story img Loader