विद्यार्थी नेता उमर खालिदच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिल्ली हायकोर्टाने देशाच्या पंतप्रधानांसाठी ‘जुमला’ सारखे शब्द वापरणं योग्य आहे का? अशा शब्दांत खडसावलं आहे. टीका करताना लक्ष्मणरेषा असली पाहिजे असंही कोर्टाने यावेळी म्हटलं. आपण कोणत्या शब्दांचा वापर करत आहोत याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे असा सल्ला यावेळी कोर्टाने दिला.
उमर खालिदच्या वकिलांनी बुधवारी (२७ एप्रिल २०२२) कोर्टात अमरावतीमधील संपूर्ण भाषण ऐकवलं. यावेळी कोर्टाने भाषणात पंतप्रधानांसाठी ‘चंगा’ आणि ‘जुमला’ असे शब्द वापरले असून हे योग्य आहे का? अशी विचारणा केली.
कोर्टाने विचारणा केल्यानंतर खालिदचे वकील त्रिदीप पेस यांनी सरकारवर टीका करणं गैर नसल्याचा युक्तिवाद केला. ते म्हणाले की, “सरकारवर टीका करणं गुन्हा असू शकत नाही. सरकारविरोधात बोलल्याबद्दल एखाद्या व्यक्तीला युएपीए अंतर्गत ५८३ दिवस तुरुंगात ठेवणं योग्य नाही. आपण इतके असहिष्णु होऊ शकत नाही. असं केल्यास लोक आपलं म्हणणं मांडू शकणार नाही”.
याआधी न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदूल आणि न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (२२ एप्रिल) उमर खालिदच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान त्याचं भाषण आक्षेपार्ह, घृणास्पद आणि द्वेषपूर्ण असल्याची टिप्पणी केली होती.
खालिदचं भाषण ऐकल्यानंतर खंडपीठाने म्हटलं होतं की, “हे आक्षेपार्ह, घृणास्पद आणि द्वेषपूर्ण आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ज्या भावनांचा वापर करण्यात आला आहे त्या लोकांना भडकावत नाहीयेत का? तुमचे पूर्वज इंग्रजांची दलाली करत होते असं तुम्ही म्हणत आहात…या अशा गोष्टी आक्षेपार्ह आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? हे आक्षेपार्हच आहे. तुम्ही भाषणात पहिल्यांदाच असा उल्लेख केला आहे असं नाही. तुम्ही किमान पाच वेळा बोलला आहोत. यामुळे एकाच विशेष समाजाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला असं वाटत आहे”.
खालिदची बाजू मांडणारे वकील १९२० मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीशांच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केलं होतं आणि गांधींनी हाक दिल्यानंतर सुरु होणारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ ही पहिली शैक्षणिक संस्था होती ही माहिती वाचत असताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं होतं. भाषणात पुढे बोलताना खालिदने त्याच विद्यापीठात आता गोळ्यांचा सामना करत असून बदनान केलं जात आहे आणि देशद्रोहींचा अड्डा असल्याचं म्हटलं होतं.
कोर्टाने यावेळी उमर खालिदने ठिकठिकाणी दिलेली भाषणं आणि त्यानंतर उत्तर पूर्व दिल्लीत उसळलेल्या दंगलीचा काही संबंध आहे का? याबद्दल माहिती द्या असं सांगितलं होतं.