जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याच्या जामीन याचिकेवरील पुढील सुनावणी गुरुवारी (४ ऑगस्ट) रोजी होणार आहे. खालीदच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायाालयाने आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी येत्या ४ ऑगस्ट रोजी होईल असे सांगितले. उमर खालीद १३ सप्टेंबर २०२० पासून कोठडीत आहे. यूएपीए कायद्यांतर्गत त्याला अटक करण्यात आलेले आहे. त्याने १७ फेब्रुवारी २०२० रोजी अमरावतीत एक भाषण केले होते. या भाषणानंतर दिल्लीमध्ये दंगल उसळली होती, असा आरोप खालीदवर आहे. दिल्ली दंगलीचा तपास करताना पोलिसांनी खालिदवर अटकेची कारवाई केली होती.

याआधी ट्रायल कोर्टाने २४ मार्च रोजी उमर खालिदचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर खालिदच्या वकिलांनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. खालिदच्या याच आव्हान याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या खंडपीठासमोर सुरु आहे. ४ ऑगस्ट रोजी विशेष सरकारी वकील अमित प्रसाद परवा आपला युक्तिवाद सुरू ठेवणार आहेत.

उमर खालीदवर काय आरोप आहे?

दिल्ली दंगलीनंतर खालिद आणि इतर अनेक जणांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युएपीए हा दहशतवादविरोधी कायदा आहे. दरम्यान, खालिदसह इतरांवर दंगलीचे मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. या दंगलीत ५३ लोक मारले गेले आणि ७०० हून अधिक जखमी झाले होते.

Story img Loader