दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात(जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप असलेले सहा विद्यार्थी रविवारी रात्री उशीरा विद्यापीठात परतले. यात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला उमर खालीद याचाही समावेश आहे.
९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमादरम्यान देशविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार सध्या देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत आहे. शुक्रवारी पोलिसांनी या कार्यक्रमाचे आयोजक उमर खालिद, रियाझूल हक आणि अनिर्बन भट्टाचार्या हे देश सोडून पोबारा करु नयेत म्हणून त्यांच्याविरोधात परिपत्रक जारी केले होते. त्यानंतर रविवारी रात्री उमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्या, आशुतोष कुमार, अनंद प्रकाश नारायण, रियाझूल हक आणि रामा नागा हे सहा विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखल झाले.
उमर खलिदच्या वडिलांना रवी पुजारीकडून धमकीचा फोन
उमर खालिदने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना यावेळी संबोधित देखील केले. ‘ होय, माझे नाव उमर खालिद आहे, पण मी दहशतवादी नाही’ अशी घोषणाबाजी करून खालिद याने त्याच्याविरोधात ठेवण्यात आलेला देशद्रोहाचा आरोप फेटाळून लावला.
दरम्यान, विद्यापीठात उमर खालिद आणि त्याचे सहकारी परतल्याची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले. पण त्यांनी विद्यापीठात प्रवेश केला नाही. विद्यापीठाच्या परवानगीशिवाय उमर खालिद आणि त्याच्या सहकाऱयांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आम्ही अटक करू शकत नाही, असे पोलीस अधिकाऱयाने सांगितले. विद्यापीठाने उमर खालिद आणि त्याच्या सहकाऱयांना आमच्या ताब्यात द्यावे किंवा त्यांनी आत्मसमर्पण करावे, असे आवाहन देखील पोलिसांनी यावेळी केले.


Story img Loader