संपूर्ण जगभर घबराट पसरवणाऱ्या इबोला या संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे गुरुवारपासून एक मोहीम हाती घेण्यात आली.
संयुक्त राष्ट्रांतर्फे ‘यूएन मिशन ऑन इबोला इमर्जन्सी रिस्पॉन्स’ (यूएनएमईईआर) या नावाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. इबोलाचा संसर्ग लायबेरिया या पश्चिम आफ्रिकेतील देशाला सर्वाधिक झाला आहे. हा संसर्ग या परिसरातील सुमारे १५ देशांना झाला असून या इबोलामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३,३३८ जणांपैकी दोन तृतीयांशहून अधिक जण याच १५ देशांमधील आहेत, अशी माहिती लायबेरियाच्या अध्यक्ष एलेन जॉनसन सिरलीफ यांनी दिली. या मोहिमेचे मुख्य प्रवर्तक अँथनी बॅनबरी यांनी या संदर्भात सिरलीफ यांची भेट घेतली. इबोलाची लागण झालेले रुग्ण शहरी भागांतून बाहेर पडून सुदूर छोटय़ा वस्त्यांमध्ये जाऊन राहतात. त्यांचा शोध घेणेही कठीण होत आहे. या संदर्भात तातडीने हालचाली न केल्यास इबोला ग्रामीण भागात सर्वत्र पसरेल, अशी भीती सिरलीफ यांनी व्यक्त केली. या साऱ्या पाश्र्वभूमीवर अँथनी बनबरी या १५ देशांचा दौरा करून वस्तुस्थितीची माहिती करून घेणार आहेत. दरम्यान, अमेरिकेत एकाला इबोलाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण प्रथम २५ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाला; परंतु त्यापूर्वी तो अनेकांच्या संपर्कात आला असण्याची शक्यता आहे, अशी भीती रुग्णालयाने वर्तवली आहे.  
इबोला कसा पसरतो?
इबोलाग्रस्त रुग्णाला ताप आला असताना, त्याचे अंग दुखत असताना, रक्तस्राव होत असताना अथवा उलटी वा जुलाब होत असताना त्याच्या अगदी निकट संपर्कात कुणी आल्यास अथवा त्याच्या शरीरातील स्रावांच्या (घाम, थुंकी इ.) संपर्कात आल्यास इबोलाचे संक्रमण होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा