अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खातमा झाल्यानंतर या दहशतवादी संघटनेला घरघर लागली आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात काढण्यात आला आहे. मात्र ही संघटना खिळखिळी झाली असली तरी ती आजही काही प्रमाणात धोकादायक आहे, असे यात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला बुधवारी हा अहवाल देण्यात आला.
ओसामाच्या खातम्यानंतर अल कायदामध्ये मोठी दुफळी माजली आहे. त्यांच्यात अनेक गट पडले आहेत. ओसामाच्या पश्चात अयमान जवाहिरी याला संघटना बांधून ठेवण्यात अपयश आले होते. या दहशतवादी संघटनेत मोठी फूट पडली असून त्यातून बाहेर पडलेल्या अनेक लहान-मोठय़ा संघटना जगभरात पसरल्या आहेत. ९-११ सारखे मोठे हल्ले करण्याची क्षमता या संघटनेत आता नाही, तरीही आजही ती कमी प्रमाणात का असेना धोकादायक आहे, असे निरीक्षण यात नोंदविले आहे.
या सर्व लहान-मोठय़ा संघटना सध्या केवळ एकाच सूत्रावर कार्यरत आहेत व ते म्हणजे दहशतीद्वारे हिंसाचार घडवून आणणे आणि त्यांचा आदर्शवाद, तत्त्वप्रणाली ही फारच हीन आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ओबामा म्हणतात..
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही या अहवालाला दुजोरा दिला आहे. लादेननंतर अल कायदाच्या दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांचाही शेवट करण्यात आला आहे. पाकिस्तान तसेच अफगाणिस्तान येथे अल कायदाविरोधात सुरू असलेला आमचा संघर्ष आता अंतिम टप्प्यात आला आहे. अल कायदाचा पूर्ण नि:पात करण्याचेच आव्हान आता उरले आहे, हे आव्हान कठीण आहे, मात्र अशक्य नाही, असे मत ओबामा यांनी व्यक्त केले.
ओसामाच्या खातम्यानंतर अल कायदाला घरघर
अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खातमा झाल्यानंतर या दहशतवादी संघटनेला घरघर लागली आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात काढण्यात आला आहे.
First published on: 08-08-2013 at 06:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Un report al qaeda down but not out