इस्रायल आणि हमासच्या युद्धात अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी काळजी व्यक्त करत मोठं विधान केलं आहे. गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे, असं स्पष्ट मत अँटोनियो गुट्रेस यांनी व्यक्त केलं. याबाबत सीएनएनने वृत्त दिलं आहे.
गुट्रेस म्हणाले, “गाझातील युद्ध हे केवळ माणसावरील संकट नाही, तर त्यापेक्षाही अधिक मोठं आहे. हे मानवतेवरील संकट आहे. या युद्धाच्या प्रत्येक तासानंतर युद्धविरामाची गरज वाढत असून तातडीने युद्धविराम केला पाहिजे.”
“या युद्धामुळे मोठ्या समुदायाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे गाझात मोठ्या प्रमाणात माणुसकीच्या नात्याने मोठी मदत करणं गरजेचं आहे. यासाठी युद्धातील दोन्ही पक्ष आणि आंतरराष्ट्रीय समुदायावर युद्धविरामाची मुलभूत जबाबदारी आहे,” असंही गुट्रेस यांनी नमूद केलं.
हेही वाचा : अग्रलेख : ‘बिबी’ बायडेनना बुडवणार!
पॅलेस्टिनमध्ये संयुक्त राष्ट्राच्या पथकातील ८९ जणांचा मृत्यू
मागील एक महिन्यापासून इस्रायल हमास युद्ध चालू आहे. यात पॅलेस्टिनमध्ये मदत आणि पुनर्वासाचं काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या पथकातील ८९ जणांचा मृत्यू झाला आहे, असंही गुट्रेस यांनी नमूद केलं.