रचनात्मक संवाद साधण्याचे भारत-पाकला आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान  यांना सुखरूपपणे सोडून देण्याच्या पाकिस्तानच्या सदिच्छा कृतीचे संयुक्त राष्ट्रांनी स्वागत केले असून दोन्ही देशांनी हीच सकारात्मकता पुढे चालू ठेवून रचनात्मक संवाद साधावा, असे आवाहनही केले आहे.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानातून शुक्रवारी भारतात परतले असून सुमारे साठ तास ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांचे मिग २१ विमान पाकिस्तानने पाडले होते. वर्धमान यांना सोडून दिल्याची आलेली वार्ता आनंददायी व स्वागतार्ह आहे, असे संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफनी डय़ुजारिक यांनी सांगितले. सरचिटणीसांनी दोन्ही देशांना सकारात्मक संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. वर्धमान यांची सुटका होईपर्यंत सर्वाचे श्वास रोखले गेले होते. अखेर वाघा सीमेमार्गे त्यांना भारताच्या अटारी येथील सीमेवर सोडण्यात आले. पाकिस्तानने नेहमीच दहशतवादाला पाठिंबा दिल्याने युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानने वैमानिकाची सुटका करण्याची दाखवलेली  सदिच्छा ही महत्त्वाची आहे.

जैश ए महंमद या संघटनेने पुलवामा येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान  ठार झाले होते. त्यानंतर भारताने २६ फेब्रुवारी रोजी जैश ए महंमदच्या बालाकोट येथील छावणीवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेही भारतात हल्ले करून एफ १६ विमानांचा वापर करून लष्करी आस्थापनांना लक्ष्य केले. वर्धमान हे पाकिस्तानी विमानांचा पाठलाग करण्यासाठी गेलेल्या आठ मिग २१ विमानांपैकी एका विमानाचे चालक होते, त्या वेळी त्यांचे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानने कैद केले. नंतरच्या घटनाक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात वर्धमान यांना भारताच्या ताब्यात देण्याचे जाहीर करताना ही कृती जीनिव्हा करारानुसार असल्याचे म्हटले होते.