जगाची लोकसंख्या आज म्हणजेच मंगळवारी (१५ नोव्हेंबर) ऐतिहासिक ८०० कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्राने वर्तवला आहे. मानवी इतिहासातील हा मैलाचा दगड ठरणार आहे. याशिवाय २०३० पर्यंत जगातील लोकसंख्या ८५० कोटी होईल, २०५० पर्यंत हा आकडा ९७० कोटींपर्यंत जाईल आणि २१०० पर्यंत जगाची लोकसंख्या १०४० कोटी इतकी होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्राचा वार्षिक वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट सोमवारी (१४ नोव्हेंबर) जागतिक लोकसंख्या दिनाचं औचित्य साधत प्रकाशित झाला. यात हे सर्व अंदाज वर्तवण्यात आले आहेत. या अहवालात सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर १९५० पासूनचा सर्वात कमी असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. २०२० मध्ये लोकसंख्या वाढीचा दर १ टक्क्यांपेक्षा कमी झाला होता.
जगाची लोकसंख्या ७०० कोटींवरून ८०० कोटी होण्यासाठी एकूण १२ वर्षे लागली. आता ही लोकसंख्या ८०० वरून ९०० कोटी होण्यासाठी १५ वर्षे लागतील. म्हणजेच ९०० कोटी लोकसंख्या होण्यासाठी २०३७ साल उजाडेल. यावरूनच जगाच्या लोकसंख्या वाढीचा दर मंदावला आहे, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश कधी होणार?
संयुक्त राष्ट्राच्या या अहवालात वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यात लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असणारा भारत चीनला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर कधी येईल याबाबतही अंदाज वर्तवण्यात आला. यानुसार, भारत सध्याच्या वेगाने पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये चीनला मागे टाकत लोकसंख्येत पहिल्या क्रमांकावर येईल.
हेही वाचा : विश्लेषण : यंदा ५० टक्के लोक स्वतःच आपली माहिती भरू शकणार, काय आहे अमित शाहांनी घोषणा केलेली ई-जनगणना?
२०५० पर्यंत जगातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ केवळ आठ देशांमध्ये होईल. यात काँगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपाईन्स आणि टांझानियाचा समावेश आहे.
याबाबत पट्टाया-थायलंड येथील परिषदेला उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि पुण्यातील सम्यकचे प्रमुख आनंद पवार म्हणाले, “जगाच्या उत्पत्तीपासून प्रथमच १५ नोव्हेंबरला पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्यांची संख्या ८०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. आज जगाची लोकसंख्या आठ बिलिअन म्हणजे ८०० कोटी होणार आहे. हा निश्चितच एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे.”
“पट्टाया-थायलंड येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कुटुंब नियोजन परिषदेमध्ये बोलताना संयुक्त राष्ट्रसंघाचा लोकसंख्या निधी (युएनएफपीए) या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. नटालिया कानेम यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ‘आठ’चा आकडा हा प्रतिकात्मक आहे. तो जर फिरवून आडवा केला, तर अनंताचे (इनफिनिटी) चित्र तयार होते. हा आकडा पार करत असणाऱ्या जगात आता स्त्रिया व मुलींसाठी विकासाच्या अनंत शक्यता निर्माण झाल्या पाहिजेत,” अशी माहिती आनंद पवार यांनी दिली.