राज्यात ५ मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेषत: महिला मतदारांना साडय़ा, मुलांना शाळेसाठी दप्तर, मोठय़ा बॅगा, तेलाची पाकिटे वाटली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा स्वरूपाच्या सुमारे सहा लाख रुपयांच्या वस्तू विविध ठिकाणी पोलिसांनी पकडल्या आहेत.
एका वाहनातून रिफाइंड तेलाचे खोके बेकायदेशीररीत्या नेले जात असताना पोलिसांनी गुरुवारी पकडले. ‘जेडीएस’चे उमेदवार बी झेड झमीर अहमद खान यांचे चित्र असलेली हस्तपत्रके या वाहनात होती. अन्य ठिकाणी एका गाडीत ६६ साडय़ा, १८ बॅगा आवश्यक ती कागदपत्रे नसताना नेण्यात येत होत्या. त्या पकडून पोलिसांनी सरकारदरबारी जमा केल्या. त्याचप्रमाणे वाल्मीकीनगर येथील एका घरात पोलिसांनी छापा टाकला असता शाळेत जाण्यासाठी मुलांना लागणारी सुमारे ५४० दप्तरे तेथे सापडली. या प्रत्येक दप्तरात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे छायाचित्र आढळले आहे. या तीनही ठिकाणी सापडलेल्या वस्तूंची चौकशी चामराजपेठ पोलिसांकडमून करण्यात येत आहे.
आणि डिटोनेटर्स!
बंगळुरू : विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात ५ मे रोजी मतदान होणार असून त्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी आंध्र प्रदेश-कर्नाटक सीमा रेषेजवळ एका बसमध्ये तपासणीदरम्यान १९८३ डिटोनेटर्स सापडले.
आंध्र प्रदेशातील पुम्मूरहून ही बस कर्नाटककडे येत होती. बाईपेल्ली चेकनाक्याजवळ तपासणीदरम्यान दोन बेवारस बॅगा या गाडीमध्ये पाळतीवर असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना आढळल्या. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सीआयएसएफच्या जवानांची तुकडी येथे तैनात करण्यात आली असून या तुकडीतील सैनिकांनी तातडीने ही बस जवळच्या निलांजी पोलीस ठाण्यात नेली. या बेवारस बॅगांची तपासणी केली असता त्यात १९८३ डिटोनेटर्स सापडल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा