बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना हटवण्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याकरिता आपण दिल्लीला गेल्याचे जनता दल (यू)चे नेते नितीशकुमार यांनी नाकारले आहे.
मांझी यांच्या भवितव्याबाबत पक्षप्रमुख शरद यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार हे दिल्लीला जात असल्याची चर्चा आहे. मांझी हे पदावर कायम राहतील की नाही, असे पत्रकारांनी विमानतळावर नितीश यांना विचारले, तेव्हा ‘हे ठरवणारा मी कुणी नाही’, असे ते म्हणाले.
पाटणा उच्च न्यायालयाने चार बंडखोर सदस्यांचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर मांझी यांनी आपण या चौघांचे सदस्यत्व संपुष्टात आणण्यास अनुकूल नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याबद्दल पक्षात सुरू असलेल्या कुजबुजीबाबत विचारले असता नितीशकुमार म्हणाले की, पक्षात असताना वेगवेगळ्या सुरांत बोलणे योग्य नाही, परंतु अशा गोष्टींमुळे जद(यू)वर काही परिणाम होणार नाही. मांझी यांनी पुरेसा विचार करून बोलावे, असे पक्षाचे नेते श्रवणकुमार म्हणाले होते. त्यावर, आपण ‘हुशार’ नसून खोटे बोलणे आपल्याला जमत नाही असे त्यांनी सांगितले होते.