सध्या सोशल मीडियावर प्रँक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रँक व्हीडिओमुळे अनेकांना तुरुंगवारीही करावी लागली आहे. अब्रुनुकसानीचा दावा ठोकून अनेक युट्यूबर्सवर कारवाई झाली आहे. आता असाच प्रकार गुजरातच्या अहमदाबाद येथे झाला आहे. प्रँक करणाऱ्या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अंबानींबरोबर चहा घेतलेले काका, अशा कॅप्शनने तरुणांनी एक प्रँक व्हीडिओ पोस्ट केला होता. या काकांनी धीरुभाई अंबानी यांचे सुपूत्र मुकेश अंबानी यांच्याबरोबर चहाचा आस्वाद घेतला होता, असा उल्लेख त्यात करण्यात आला होता.
जीवराज पार्क येथे राहणारे चिमण बारोट (७८) यांनी सायबर क्राईम पोलिसांकडे आयपीसी कलम ५०१ अंतर्गत दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
बारोट या वृद्धाने आपल्या पोलीस तक्रारीत म्हटलं आहे की, पत्नीला गुडघेदुखीचा त्रास होत असल्याने ९ फेब्रुवारी रोजी मी परिसरातील रुग्णालयात याबाबत विचारयाल गेलो होतो. परंतु, रुग्णालय बंद असल्याने मी पायी चालत घरी परतत होतो. यावेळी दोन तरुणांनी मला लिफ्ट देऊ केली. ही लिफ्ट मी स्वीकारली. मी गाडीत बसताच कारमधील दोघांनी माझी खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. तसंच, या दोघांनी माझी वैयक्तिक माहितीही विचारली. यावेळी दोघांनी धीरुभाई अंबानींबद्दल विचारण्यास सुरुवात केली. या संवादादरम्यान बारोट यांचं निवासस्थान आल्याने ते गाडीतून उतरले.
त्यानंतर शुक्रवारी बारोट यांना ‘अंबानीबरोबर चहा घेतलेले काका’ हा व्हीडिओ दिसला. मंगेश प्रजापतीने हा व्हीडिओ अपलोड केला होता. हा व्हीडिओ त्यांच्या परवानगीशिवाय अपलोड करण्यात आला होता. त्यांची प्रतिमा खराब करण्याच्या प्रयत्न या व्हिडीओतून करण्यात आल्याचा दावा संबंधित वृद्धाने केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे.
त्यामुळे प्रँक व्हीडिओ करताना यापुढे सावधगिरी बाळगा. कोणाच्याही परवानगीशिवाय त्यांचे व्हीडिओ अपलोड करणे कायद्याने गुन्हा आहे. प्रँक व्हीडिओमुळे कितीही आनंद, व्ह्युज, लाईक्स आणि कॉमेंट्स मिळत असतील तरी याचा फटका बसण्याची शक्यता आहे.