गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्याच्या पालनपूर येथे एक पूल कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचे काही व्हिडीओ समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओत एक व्यक्ती जीव मुठीत घेऊन धावताना दिसत आहे. मात्र, तो स्वत:ला वाचवू शकला नाही.
‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरात बांधकामाधीन असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. क्रेनच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. आरटीओ चेकपोस्टजवळ ही घटना घडली असून बांधकामाधीन पुलाच्या खांबांवर नुकतेच लावलेले सहा काँक्रीट गर्डर (स्लॅब) कोसळले आहेत.
गुजरातमधील पालनपूर येथे पूल कोसळल्याचा व्हिडीओ:
या घटनेची अधिक माहिती देताना बनासकांठाचे जिल्हाधिकारी वरुणकुमार बरनवाल म्हणाले, “पालनपूर येथे एक पुलाचं बांधकाम सुरू होतं. या प्रक्रियेदरम्यान पूलाचे सहा गर्डर कोसळले आहेत. या घटनेची तांत्रिक चौकशी करण्यासाठी गांधीनगरहून पालनपूरला तपास पथक रवाना झालं आहे. आज रात्रीपर्यंत त्यांचा अहवाल येणं अपेक्षित आहे. त्यानंतर नेमकं काय झालं होतं? याची कळू शकेल. यांत्रिक अपयशामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या पुलाखालून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. घटनास्थळी बचावकार्य केलं जात आहे.”