लोकसत्ता विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातील औपचारिक व कंटाळवाण्या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर संसदेच्या नव्या इमारतीमध्ये विशेष अधिवेशनाची रीतसर सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संसदेच्या दोन्ही सदनांतील खासदारांनी नव्या संसद भवनामध्ये मंगळवारी प्रवेश केला. हा संसद प्रवेशाचा उत्सव भाजप दिवसभर साजरा करताना दिसत होते!
संसदेच्या नव्या इमारतीला गज द्वार, अश्व द्वार, गरुड द्वार, मकर द्वार, शार्दुला द्वार आणि हंस द्वार असे सहा दरवाजे आहेत. मकर द्वार जुन्या संसद भवनाच्या मुख्य द्वारासमोर असून तिथून खासदारांना प्रवेश दिला जात होता. मोदींसह अमित शहा, राजनाथ सिंह, अनुराग ठाकूर, प्रल्हाद जोशी, अर्जुन मेघवाल आदी केंद्रीय मंत्र्यांनी नव्या संसदेत प्रवेश केल्यानंतर मकर द्वारासमोर भाजपच्या खासदारांची छायाचित्रांसाठी झुंबड उडाली.
हेही वाचा >>>“भारत चंद्रावर पोहोचला आणि पाकिस्तान जगाकडे पैशांची भीक मागतोय”, नवाझ शरीफ यांचं विधान
नव्या संसदेतील प्रवेश सोहळा पाहण्यासाठी भाजपने दिल्लीतील शे-दोनशे कार्यकर्त्यांना संसदेमध्ये आणले होते. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. भाजपच्या खासदारांसोबत कार्यकर्तेही छायाचित्रे काढून घेण्यात मग्न झालेले होते. तसेच प्रेक्षक कक्षांत जाण्यासाठीही गर्दी केली.
जुन्या संसद भवनामध्ये मोदी द्वार क्रमांक-५ मधून संसदेत प्रवेश करत व त्यांची सुरक्षा यंत्रणा तिथे तैनात केली जात असे. नव्या इमारतीमध्ये मोदी गरुड द्वारातून प्रवेश करतील. मंगळवारी मोदींची सुरक्षा यंत्रणा याच द्वारासमोर तैनात झालेली पाहायला मिळाली. लोकसभेच्या कक्षांमध्ये जाण्यासाठी हंस द्वारातून तर, राज्यसभेच्या कक्षांमध्ये जाण्यासाठी गरुड द्वारातून पत्रकार तसेच, प्रेक्षकांना प्रवेश दिला जात होता.
नव्या इमारतीतील प्रवेश सोहळय़ापूर्वी मंगळवारी जुन्या संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहाच्या बाहेर दोन्ही सदनांमधील सदस्यांचे एकत्रित छायाचित्र काढले गेले. संसद सदस्यांची जुन्या इमारतीतील ही अखेरची भेट होती. मोदींसह शरद पवार, सोनिया गांधी व अन्य ज्येष्ठ नेते पहिल्या वा दुसऱ्या रांगेत बसले होते. राहुल गांधी मात्र शेवटून दुसऱ्या रांगेत कोपऱ्यात उभे होते.
हेही वाचा >>>“नेमकं काय रिकामं आहे? नरेंद्र मोदींचं डोकं की…”, अभिनेते प्रकाश राज यांनी उडवली खिल्ली
मध्यवर्ती सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांशीही हस्तांदोलन आणि हास्यविनोद केले. इथल्या निरोप समारंभाला सोनिया गांधी अधीर रंजन व मल्लिकार्जुन खरगेंसह पहिल्या रांगेत बसलेल्या दिसल्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सोनियांच्या आसनाच्या शेजारी उभे राहून ज्योतिरादित्य शिंदे सोनिया, अधीर रंजन व खरगे यांच्याशी बराच वेळ गप्पा मारत असल्याचे दिसले. अधीर रंजन व खरगे व्यासपीठावर गेल्यावर ज्योतिरादित्य सोनियांच्या शेजारी बसले होते.
मध्यवर्ती सभागृहातील कार्यक्रमामध्ये शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उपस्थित होते. शिवसेना-ठाकरे गटाचे अरिवद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, शिंदे गटाचे खासदार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल होते. लोकसभाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, पंतप्रधान, राज्यसभेचे नेते, दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते आदी सगळय़ांची भाषणे झाल्यामुळे कार्यक्रम लांबलचक झाला.
ऐतिहासिक क्षणांना उजाळा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या संसद भवनातील अनेक ऐतिहासिक क्षणांना उजाळा दिला. ७० वर्षांत इथे चार हजारहून अधिक कायदे केले गेले. शहाबानो प्रकरणात मुस्लीम महिलांवर अन्याय झाला पण, तिहेरी तलाक बंदी कायदा करून त्यांना न्याय मिळाला. अनुच्छेद ३७० रद्द करण्याची ऐतिहासिक घटनात्मक दुरुस्ती केली. गेल्या काही वर्षांत तृतीय पंथीयांच्या हिताचे कायदेही झाले, असे मोदी म्हणाले.