गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन याला इंडोनेशियातील पोलिसांनी अटक केल्याच्या वृत्ताला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी दुजोरा दिला. याशिवाय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाचे संचालक अनिल सिन्हा यांनीदेखील बाली पोलीसांनी राजनला काल अटक केल्याचे सांगितले. सीबीआयच्या (इंटरपोल) सांगण्यावरून बाली पोलीसांनी २५ ऑक्टोबरला मोहन कुमार या भारतीय व्यक्तीला अटक केली होती. ही व्यक्ती राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन असून तो फरारी म्हणून घोषित होता. सीबीआय गेले अनेक दिवस ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांच्या मदतीने छोटा राजनच्या अटकेसाठी पाठपुरावा करत होती. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन सुरक्षा यंत्रणांनी तत्परतेने कारवाई केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सध्या पुढील कायदेशीर कारवाई सध्या सुरू असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिलेल्या खबरीनुसार इंडोनेशियन अधिकाऱ्यांच्या पथकाने छोटा राजनला रविवारी अटक केली. इंडोनेशियाच्या बाली येथील विमानतळावरून राजनला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले. आम्हाला रविवारी कॅनबरा पोलिसांकडून रेड कॉर्नर नोटीस जारी असलेल्या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही विमातळावर त्या व्यक्तीला ताब्यात घेतले, अशी माहिती बाली पोलीस दलाचे प्रवक्ते हेरी वियांटो यांनी दिली. ५५ वर्षीय छोटा राजन १९८६ पासून फरार आहे. गेल्या दोन दशकांपासून इंटरपोल त्याचा कसून शोध घेत होते. अखेर त्याला १९५५ मध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते.
समाजवादी पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दाऊद आणि छोटा राजन यांचे टिपलेले छायाचित्र. या छायाचित्रात दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकर, छोटा शकील आणि डाव्या बाजूच्या कोपऱ्यात अबु आझमीदेखील दिसत आहेत.
दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील मैत्री आणि शत्रुत्वामुळे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील एक काळ प्रचंड गाजला होता. मुंबईतील १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी स्फोटानंतर तर दाऊद आणि राजन यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. हा स्फोट दाऊदने घडवल्याचा आरोप आहे. हा स्फोट घडवणाऱ्या आरोपींची हत्या केल्याचा आरोप छोटा राजनवर आहे. याशिवाय, काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार ज्योतीर्मय डे उर्फ जे डे यांच्या हत्येमागेही छोटा राजनचा हात असल्याचा आरोप आहे.