अबूधाबीमध्ये छोटा शकीलच्या भावाला अटक झाली आहे. छोटा शकीलचा भाऊ अनवर बाबू शेखला अबूधाबी विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे पाकिस्तानी पासपोर्टही सापडला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी हा एक झटका मानला जात आहे. छोटा शकील अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमचा जुना आणि विश्वासू साथीदार आहे. अनवरला अबू धाबी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आता त्याच्या प्रत्यार्पणावरुन भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु झाला आहे.

अबूधाबीमधील भारतीय दूतावास अनवरचा ताबा मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. त्याचवेळी पाकिस्तानकडूनही अनवरला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अनवरकडे पाकिस्तानी पासपोर्ट असल्याने त्याला आमच्या ताब्यात द्या असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अबूधाबीमधील अधिकाऱ्यांनी ठोस माहितीच्या आधारावर अनवर बाबूला अटक केली.

अनवरच्या विरोधात आधीपासूनच रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसोबत काम करत असून भारताविरोधात दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. छोटा शकीलचे मूळ नाव शकील बाबूमिया शेख असे आहे. १९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील तो एक आरोपी आहे.

छोटा शकील डी कंपनीसाठी शस्त्रास्त्र तस्करी, खंडणी वसुलीचे काम करतो. छोटा राजनने दाऊदची साथ सोडल्यानंतर छोटा शकीलने अनेकदा राजनवर हल्ल्याचा प्रयत्न केला. छोटा राजनच्या अटकेनंतर जेलमध्ये घुसून छोटा राजनची हत्या करण्याची त्याने धमकी दिली होती. त्यानंतर राजनच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगा मौलाना झाल्यानंतर आता दाउदचा खास हस्तक मानला जाणाऱ्या छोटा शकीलचा मुलगाही अध्यात्माच्या वाटेवर निघाल्याचे वृत्त होते.

छोटा शकीलने दाऊदची साथ सोडली ?

छोटा शकीलने काही महिन्यापासून दाऊद पासून अलिप्त होऊन वेगळी टोळी बनविल्याचे बातम्या पसरल्या होत्या. अनवर मुंबई आणि ठाणे पोलिसांच्या वॉन्टेड यादीत असून तो ताब्यात आला तर अनेक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलीस वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.
दाऊदसोबत छोटा शकील हा कराचीत राहत होता. मात्र दाऊदच्या साम्राज्याचा वारसदार भाऊ अनिस बनणार होता. अनिस आणि छोटा शकील यांच्यात वाद वाढला आणि दाऊद पासून छोटा शकील हा वेगळा झाला आणि त्याने स्वतःची टोळी बनविल्याचे बातम्या आणि चर्चा होती.

ठाणे पोलिसांच्या रेकॉर्डवर अनवर
अनवर बाबू शेख हा ठाणे पोलिसांच्या रेकॉर्डवर वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत आहे. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी जेव्हा दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याच्या खंडणी वसूली प्रकरणात गोरेगाव येथे छापेमारी केली तेव्हा एका आरोपीच्या घरात एके-५६ ही रायफल सापडली होती. ती एके-५६ रायफल छोटा शकीलचा भाऊ अनवरने दिल्याची माहिती आरोपीने दिली.

Story img Loader