गेल्या काही वर्षांमध्ये फक्त भारतच नव्हे, तर जगभरात महिला सशक्तीकरणासाठी असंख्य मोहिमा काढण्यात आल्या. उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या. मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. महिलांचा सामाजिक दर्जा, त्यांच्याकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टीकोन यात बदल झाल्याचं चित्रही निर्माण झालं. पण UNDP अर्थात युनायडेट नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालातून या समजाला तडे देणारे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. यातलाच एक निष्कर्ष म्हणजे जगातल्या सरासरी २५ टक्के लोकांना पुरुषांनी महिलांना मारहाण करणं योग्य वाटतं!
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत Gender Social Norms Index हा अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळे महिला सशक्तीकरण, सबलीकरणाच्या कितीही गप्पा झाल्या, तरी अजूनही जागतिक स्तरावर महिलांबाबतचा समाजाचा दृष्टीकोन पुरेसा प्रगल्भ झाला नसल्याचंच समोर आलं आहे. जगातली ८५ टक्के लोकसंख्या राहणाऱ्या ८० देशांमधील माहिती या अहवालासाठी गोळा करण्यात आली आहे. वर्ल्ड व्हॅल्यू सर्वेच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या माहितीचा यासाठी वापर करण्यात आला. त्यात २०१० ते २०१४ आणि २०१७ ते २०२२ या काळातील माहिती प्रामुख्याने या सर्वेसाठी वापरण्यात आली आहे.
काय आहेत अहवालाचे धक्कादायक निष्कर्ष?
या अहवालानुसार, सरासरी २५ टक्के लोकसंख्येला पुरुषांनी महिलांना मारहाण करणं योग्य असल्याचं मत नोंदवलं आहे. जगातील तब्बल ९० टक्के पुरुष व महिलांनी किंवा १० पैकी ९ पुरुष व महिलांनी पुरुषांच्या तुलनेत महिलांबाबत किमान एक भेदभाव करणारं मत नोंदवलं आहे. त्यामुळे महिलांबाबत केला जाणारा भेदभाव समाजामध्ये खोल मुळापर्यंत रुजल्याचा निष्कर्ष अभ्यासक काढत आहेत.
पुरुष महिलांपेक्षा उत्तम राजकीय नेते
या अहवालानुसार, जगभरातील ६९ टक्के लोकसंख्येचा असा विश्वास आहे की पुरुष हे महिलांपेक्षा चांगलं राजकीय नेतृत्व करू शकतात. ४० टक्के लोकसंख्येचं असं मत आहे की पुरुष हे महिलांपेक्षा चांगले व्यावसायिक असतात. फक्त २७ टक्के लोकांना असं वाटतं की चांगल्या लोकशाहीसाठी स्त्री-पुरुष समानता महत्त्वाची आहे. २८ टक्के लोकांना असं वाटतं की विद्यापीठ स्तरावरील शिक्षण हे महिलांपेक्षा पुरुषांसाठी जास्त महत्त्वाचं आहे!
UNDP च्या मानव हक्क विभागाचे प्रमुख पेड्रो कॉन्सेकाओ यांनी या निष्कर्षांवर चिंता व्यक्त केली आहे. “या निष्कर्षांमुळे लैंगिक समानतेच्या पातळीवर मानवी विकासासमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं दिसत आहे”, असं ते म्हणाले.