तंत्रज्ञानाच्या युगात नवनविन संकल्पना पुढे येत आहेत खऱया पण, याची भुरळ सामान्य माणसाला काय करायला भागपाडते हे या वृत्तामधून पुढे आले आहे. चंगळवादी तंत्रज्ञानाच्या मोहापायी मानवी प्रवृत्ती कोणत्याही थराला जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना चीन मध्ये घडली. चीनमधील एका बेरोजगार दाम्पत्याने आयफोन विकत घेण्यासाठी आपल्या पोटच्या पोरीला विकण्याची धक्कादाय घटना घडली.
चीनमधील एका दैनिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याला दोन मुले असून सध्या ती महिला पुन्हा गर्भवती आहे. म्हणजेच या तिसऱया मुलाने अजून या जगात पाऊलही ठेवलेले नाही तोच या निर्दयी माता-पित्यांनी या तिसऱया मुलाला विकण्याच्या जाहिराती जून महिन्यापासून ऑनलाईन संकेतस्थळावरून देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मुलीचा जन्म होताच त्या मुलीला एका व्यक्तिला विकण्यात आले आणि त्याच दिवशी या दाम्पत्याच्या बॅंकेच्या खात्यात बक्कळ पैसा जमा झाला. या पैशातून त्यांनी आयफोन आणि इतर चैनीच्या वस्तू खेरेदी केल्याची हादरवून सोडणारी घटना घडली.
या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी खोलवर चौकशी करून या दाम्पत्याला अटक केली आहे.