पैशांसाठी कोण काय करेल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. कमी कष्टात पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे गुन्हे होतात. दिल्लीत अशाचप्रकारे पैशांसाठी एका बेरोजगार तरुणाने चक्क मॅट्रिमॉनिअल साईटचा वापर केला. आरोपी तरूणाने आधी मॅट्रिमॉनिअल साटईवरून महिलांशी ओळख तयार केली आणि नंतर लग्नाचं आश्वासन देत विश्वास संपादन केला. मात्र, यानंतर आरोपीने या महिलांचे खासगी फोटो लिक करण्याची धमकी देत पीडितांची आर्थिक लुबाडणूक केली. या फसवणुकीला बळी पडणाऱ्या महिलांमध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील महिलांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहारनपूरच्या ३२ वर्षीय आरोपीने गुडगावच्या आयटी कंपनीतील एका महिलेचं शोषण केल्यानंतर फसवणुकीचं हे रॅकेट उघडकीस आलं. या महिलेने तक्रार केल्यानंतर शाहदरा पोलिसांनी तपासाची सुत्रं फिरवली आणि आरोपीचा शोध लावला.

अनेक ठिकाणी छापे मारल्यानंतर आरोपी अटकेत

पोलीस उपायुक्त आर. साथियासुंदरम म्हणाले, “आरोपीचं नाव सचदेव असं असून तो नेब सराई येथे सापडला. मात्र, तो पोलिसांपासून पळण्यासाठी आपलं ठिकाण वारंवार बदलत होता. त्यामुळे अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यानंतर शुक्रवारी (२१ जानेवारी) आरोपीला अटक करण्यात यश आलं.”

बरोजगार असल्याने पैशांसाठी फसवणूक केल्याची कबुली

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली त्यात त्याने बेरोजगार असल्याचं सांगितलं. तसेच पैसे मिळवण्यासाठी महिलांची फसवणूक केल्याचं कबुल केलं. आरोपी आधी महिलांशी मॅट्रिमॉनिअल साईटवर ओळख करायचा. त्यांना लग्नाचं आश्वासन देत विश्वास संपादित करायचा. त्यानंतर तो महिलांना ब्लॅकमेल करत खंडणी वसूल करायचा.

हेही वाचा : बीडमध्ये वक्फ जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप, एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षासह वडिलांविरुध्द गुन्हा दाखल

विशेष म्हणजे आरोपीने आतापर्यंत अशाप्रकारे ५ महिलांची फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. या महिलांना १० ते १२ लाखांना गंडा घातला आहे. यातील काही पीडित महिला गाझियाबाद, भोपाळ आणि इतर शहरांमधील आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unemployed youth cheat womens threat about private photo using matrimonial sites pbs