मागील जवळपास दोन वर्षाहून अधिक काळापासून भारतासह जगभरात करोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले. तर लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या. याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता देशात रोजगार वाढल्याचं चित्र आहे. बरोजगारांच्या दरात घट झाल्याचं एका सरकारी अहवालात म्हटलं आहे. संबंधित अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला.
वार्षिक नियतकालिक लेबर फोर्स सर्वेक्षणात जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ मध्ये देशात बेरोजगारीचा दर ४. २ टक्क्यांवर आला आहे. हा दर २०१९-२० मध्ये ४.८ टक्के इतका होता. लेबर फोर्स पार्टीसिपेशन रेट (LFPR) आणि कामगार सहभाग दरात (WPR) देखील वाढ झाल्याचं संबंधित अहवालात म्हटलं आहे. LFPR च्या अहवालात ग्रामीण आणि शहरी भागातील आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. या अहवालात जुलै २०२० ते जून २०२१ पर्यंतच्या आकडेवारीचा विचार करण्यात आला आहे.
२०१७-१८ मधील पहिल्या PLFSच्या अहवालापासून देशात सातत्याने बेरोजगारीच्या दरात वाढ झाली होती. २०१७-१८ मध्ये बेरोजगारी दर ६.१ टक्क्यांवर होता. करोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत PLFS साठी माहिती गोळा करता आली नाही. पण पुन्हा निर्बंध उठवल्यानंतर डेटा गोळा करण्याचं काम सुरू केलं, अशी माहिती NSO (राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय) ने दिली. काही त्रैमासिक अहवालांनी शहरी भागात रोजगारावर परिणाम झाल्याचा अहवाल जारी केला होता. इतरही अनेक खासगी सर्वेक्षणांनी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे नोकऱ्यांवर परिणाम झाल्याचं म्हटलं आहे.