एकीकडे केंद्र सरकार बँकांचं कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एखादा दुर्मिळ आर्थिक अपराध केल्याने लगेच एखाद्या व्यवसायिकाला घोटाळेबाज म्हणणं योग्य नाही असं वक्तव्य केलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे बँक आणि उद्योग जगतासहित सरकारलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

विजय मल्ल्याने विमान कंपनीत आलेल्या अडथळ्यांमुळे कर्ज फेडलं नाही म्हणून लगेच त्याच्यावर घोटाळेबाज म्हणून शिक्का मारणं योग्य नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. टाइम्स नेटवर्कच्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे. सोमवारी लंडन कोर्टाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिली आहे.

’40 वर्ष विजय मल्ल्या नियमित पैसे फेडत होता, त्यावरील व्याजही भरत होता. 40 वर्षांनी जेव्हा तो एव्हिएशनमध्ये गेला आणि त्यानंतर तो अडचणीत आला तर एकदम चोर झाला ? जे पन्नास वर्ष व्याज भरत होता ते ठीक आहे. पण एकदा त्याने नाही भरलं तर लगेच घोटाळेबाज झाला ? ही मानसिकता योग्य नाही’, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरी यांनी प्रत्येक व्यवसायात जोखीम असते असं म्हटलं आहे. जर ग्लोबल रिसेशन किंवा अंतर्गत समस्यांमुळे अडचण आली असेल तर त्या संबंधित व्यक्तीला मदत केली पाहिजे असंही नितीन गडकरी बोलले ओहेत.

गडकरींनी सुरुवातीलाच आपला विजय मल्ल्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले की, ‘जर मल्ल्याने घोटाळा केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे’. ‘पण जर एखादी व्यक्ती अडचणीत असेल आणि आपण त्याच्यावर घोटाळेबाज म्हणून ठपका ठेवला तर अर्थव्यवस्था पुढे जाणार नाही’, असंही गडकरी बोलले आहेत. ‘एका चुकीची परवानगी सर्वांना असली पाहिजे. आजकाल प्रत्येकाला वाटतं की प्रत्येक माणूस चोर आहे, असं नाही झालं पाहिजे’, असं मत गडकरींनी व्यक्त केलं आहे.

Story img Loader