तामिळनाडूतील कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला गावकऱयांचा तीव्र विरोध होत असताना, या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील महिन्यात कार्यान्वित होईल, असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दिले आहे. ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी डर्बनमध्ये आलेल्या डॉ. सिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही देशांनी विविध द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. त्यावेळी डॉ. सिंग यांनी हे आश्वासन पुतीन यांना दिले.
पहिला टप्पा पुढील महिन्यात कार्यान्वित होईल, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, प्रकल्पाच्या तिसऱया आणि चौथ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेली सर्व अंतर्गत मंजुरी प्रमाणपत्रे आम्ही मिळविली आहेत. हे दोन टप्पेही लवकरच कार्यान्वित होतील.
द्विपक्षीय चर्चेवेळी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, केंद्रीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांच्यासह इतर काही मान्यवर पंतप्रधानांसमवेत उपस्थित होते.
कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला तिरुनेवली जिल्ह्यातील गावकरय़ांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत कार्यान्वित होऊ नये, यासाठी प्रकल्पाभोवती असलेल्या समुद्राच्या पाण्यामध्ये गावकऱयांनी निदर्शने केली. जपानमध्ये आलेल्या सुनामीनंतर फुकुशिमा येथील अणुऊर्जा केंद्रात घडलेल्या दुर्घटनेनंतर कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला आणखी तीव्र झाला.