पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारतातील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. काल ( ११ नोव्हेंबर ) पंतप्रधान कर्नाटक आणि तामिळनाडूत होते. आज ( १२ नोव्हेंबर ) पंतप्रधान मोदी तेलंगणाच्या दौऱ्यावर असून, काही प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला जोरदार विरोध करण्यात आला. यासाठी काही भागात त्यांच्याविरुद्ध बॅनरबाजी करण्यात आली. त्यावर त्यांना रावणाच्या रूपात दाखवण्यात आलं आहे.
शनिवारी रामगुंडम परिसरात पंतप्रधान मोदींच्या विरोधात काही आक्षेपार्ह बॅनर्स लावल्याचं दिसून आलं. त्यावर मोदींना रावण असल्याचं दाखवलं आहे. तसेच, पंतप्रधानांनी तेलंगणाला दिलेल्या नऊ प्रकल्पांच्या आश्वासनाचं काय झालं?, असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
तर, दुसरीकडे आज टीआरएसच्या विद्यार्थी संघटनेने उस्मानिया विद्यापीठ परिसरात पंतप्रधानांविरोधात निदर्शने केली. यावेळी ‘गो बॅक मोदी’चे नारे लगावण्यात आले. या नारे लगावणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा : “राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता”, संजय राऊतांचे विधान
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रमगुंडम येथील बियाणांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. याप्रकल्पाचा खर्च ६ हजाप ३३८ कोटी रुपये आहे. तर, ९९० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या भद्राचलम रोड ते सत्तुपल्ली या ५४ किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचेही पंतप्रधान उद्घाटन करतील. ‘इंडिया टुडे’ने हे वृत्त दिलं आहे.