अमेरिका आणि चीनमध्ये हेरगिरीवरून वातावरण तापलं आहे. अमेरिकेच्या हवाई हद्दीत घुसून कथित हेरगिरी करणारे चीनचे एअर बलून अमेरिकेने पाडल्याच्या बातम्या ताज्या असतानाच कॅनडा आणि अमेरिकेत अजून एक संशयावस्पद वस्तू, बलून आणि कारसदृष्य ऑब्जेक्ट्स हवेत उडताना दिसले आहेत. अमेरिकेच्या वायू सेनेने हे चारही ऑब्जेक्ट्स पाडले आहेत. याचदरम्यान, यूएस नॉर्थ अमेरिकन एयरोस्पेस डिफेन्स कमांड आणि नॉर्दर्न कमांडचे प्रमुख एअर फोर्स जनरल ग्लेन वॉनहर्क यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
ग्लेन वॉनहर्क म्हणाले की, अमेरिकन वायू सेनेने पाडलेल्या वस्तू एलियन्सशी संबंधित आहेत की नाही हे सांगता येणार नाही. परंतु तशी शक्यता नाकारता येत नाही. आमचे तज्ज्ञ त्याचा अभ्यास करून कोणती माहिती मांडतात, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. आपण ते काम तज्ज्ञांवर सोपवू. आम्ही देशासमोर कोणतेही ज्ञान-अज्ञात धोके ओळखून त्याची माहिती गोळा करत असतो.
कमांडर म्हणाले की, आम्ही त्या वस्तूला चिनी एअर बलून म्हणणार नाही. कारण तशी ठोस माहिती मिळालेली नाही. अमेरिकेच्या हवाई हद्दीत कथित हेरगिरी करणारा चिनी बलून दिसल्यानंतर एकामागून एक संशयास्पद वस्तू अमेरिकेच्या हवाई हद्दीत दिसल्या आहेत. तसेच रविवारी अशीच एक वस्तू कॅनडाच्या हवाई हद्दीत पाहायला मिळाली. अमेरिका आणि कॅनडा सीमेवर अशी एक वस्तू अमेरिकन वायू सेनेने हल्ला करून पाडली.
हे ही वाचा >> यशस्वी होणं इतकं सोपं असतं? शिकारीसाठी आलेल्या वाघाला त्या प्राण्याने पार दमवलं…प्राण्यांच्या रेसचा Video व्हायरल
६ चिनी कंपन्या ब्लॅकलिस्ट
दरम्यान, अमेरिकने चीनच्या सहा कंपन्यांना निर्यात ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं आहे. अमेरिकेने हे पाऊल चीनच्या कथित हेरगिरी करणाऱ्या बलून प्रकरणानंतर उचललं आहे. अमेरिकेने ब्लॅकलिस्ट केलेल्या सहा कंपन्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सहा कंपन्यांमध्ये बीजिंग नानजियांग एयरोस्पेस टेक्नोलॉजी कंपनी, चायना इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी ग्रुप कॉर्पोरेशन 48th रिसर्च इंस्टीट्यूट, डोनगुआन लिंगकोन रिमोट सेन्सिंग टेक्नोलॉजी कंपनी, ईगल्स मॅन एव्हिएशन सायन्स अँड टेक्नोलॉजी ग्रुप कंपनी, ग्वांग्झू टियान हाय जियांग एव्हिएशन टेक्नोलॉजी कंपनी आणि शांगझी ईगल्स मॅन एव्हिएशन सायन्स अँड टेक्नोलॉजी ग्रुप कंपनीचा समावेश आहे.