आपल्या बहिणीला तिचे पती शशी थरूर यांच्याकडून दुखापत होईल, या गोष्टीची आपण कल्पनाच करू शकत नाही, असे स्पष्टीकरण  सुनंदा यांचे भाऊ राजेश यांनी शनिवारी दिले. तसेच सुनंदा यांच्या मृत्यूबाबत उठणाऱ्या  वावडय़ांमुळे आपल्या कुटुंबाला मनस्ताप होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुनंदा यांचा मुलगा शीव मेनन यानेही काही दिवसांपूर्वी थरूर आपल्या आईला इजा पोहोचवू शकत नसल्याचे म्हटले होते. तर आता सुनंदा यांच्या भावानेदेखील थरूर यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
लष्करी अधिकारी असलेले राजेश यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सुनंदा एक कणखर व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे ती स्वत:ला काही इजा करून घेईल, असा विचार हास्यास्पद आणि अविश्वसनीय असा आहे. सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी ज्या वावडय़ा प्रसारमाध्यमांमधून उठत आहेत, त्याचा आपल्या कुटुंबाला मनस्ताप होत आहे. त्यामुळे याप्रकरणी जलदगतीने तपास करून या वावडय़ांना पूर्ण विराम मिळावा, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. थरूर आणि सुनंदा यांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते. प्रत्येक घरात होतात ते त्यांच्यात थोडेफार वाद असण्याची शक्यता आहे. मी त्यांचे वैवाहिक जीवन जवळून पाहिले आहे. त्यामुळे थरूर यांच्याकडून आपल्या बहिणीला इजा होण्याची शक्यता नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader