आरोग्य क्षेत्रासाठी २०१९-२०२० या आर्थिक वर्षांत ६१३९८ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून त्यात आयुष्मान भारत व पंतप्रधान जनआरोग्य विमा योजनेसाठी ६४०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. आरोग्य खात्याचा योजना खर्च आगामी आर्थिक वर्षांत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत १६ टक्के वाढवण्यात आला असून २०१८-१९ मध्ये आरोग्यासाठीची तरतूद ५४३०२.५० कोटी रुपये होती. आताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्राच्या आयुष्मान भारत व प्रधानमंत्री आरोग्य योजनेसाठी ६४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ही योजना २३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या योजनेत १० कोटी कुटुंबांना वार्षिक पाच लाखांचा विमा देण्यात आला आहे. आयुष्मान भारत आरोग्य व कल्याण केंद्रांसाठी २५० कोटींची तरतूद करण्यात आली असून राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेंतर्गत सर्वकष व दर्जेदार सेवा देण्यात येणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेत आरोग्य व कल्याण केंद्रे स्थापन करण्यासाठी १३५०.०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत १.५ लाख उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रे ही आरोग्य कल्याण केंद्रात २०२२ पर्यंत रूपांतरित केली जाणार आहेत. या केंद्रात रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, वृद्धत्वानंतरचे आजार यावर उपचार केले जाणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य योजनेसाठी २०१९-२० मध्ये ३१७४५ कोटी रुपये तरतूद केली असून ती गेल्या अर्थसंकल्पात ३०६८३.०५ कोटी रुपये होती. राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सुरू करण्यात आली असून त्यासाठी १५६ कोटी रुपये तरतूद केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा