प्रतिदिन २७ किमीची विकास यात्रा
विकास यात्रेवर निघालेल्या देशाचे चित्र दिवसेंदिवस बदलत असून विकास हे एक ‘जन आंदोलन’ होत असल्याचा उल्लेख करत नव्या वित्त वर्षांचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पीयूष गोयल या हंगामी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशातील पायाभूत क्षेत्राच्या वेगाचे कौतुक केले. या क्षेत्रातील रस्ते, सागरीमार्ग तसेच हवाईमार्गाचे जाळे अधिक घट्ट होत असून नागरी वाहतूक, वायू तसेच ऊर्जेवरील वाहनांचे रुपांतर, अत्याधुनिक पायाभूत सुविधा याच्या जोरावर भारताची वाटचाल येत्या ८ वर्षांत १० लाख कोटी डॉलरच्या घरात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
भारत हा जगातील सर्वात जलद वेगाने महामार्ग तयार करणारा देश गणला जात असून येथे दिवसाला २७ किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार होतात, असे गोयल यांनी सांगितले. देशाच्या विकासात पायाभूत क्षेत्राचा सिंहाचा वाटा असून सुलभ जीवनशैलीत ते एक कणा म्हणून कार्य करते, असे ते म्हणाले. नव्या पिढीची पायाभूत सुविधा निर्माण करताना येत्या पाच वर्षांत ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था त्यावर तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.
दिल्ली तसेच आसाम, अरुणाचलमधील अनेक महामार्ग प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून तुंबले होते, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामुळे ५० कोटी जनतेला थेट लाभ झाल्याचेही ते म्हणाले.