निर्यातदार संघटनांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत
लोकसभेत शुक्रवारी २०१९-२० चा हंगामी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्वतंत्र मत्स्य व्यवसाय खाते सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीला मोठी चालना मिळण्यास मदत होईल, असा आशावाद ‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन’ (एफआयईओ)ने व्यक्त केला आहे.
सध्या भारताची मत्स्य उत्पादनांची निर्यात ७०० कोटी अमेरिकी डॉलरहून जास्त आहे. अर्थसंकल्पातील घोषणेबाबत ‘एफआयईओ’चे अध्यक्ष गणेश कुमार गुप्ता म्हणाले की, ‘यामुळे २०२०-२१ पर्यंत मत्स्य उत्पादनांची निर्यात एक हजार कोटी अमेरिकी डॉलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.’ मत्स्य व्यवसायावर सातत्याने लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी हा विभाग स्वतंत्र ठेवण्याचे सूतोवाच अर्थमंत्री गोयल यांनी केले आहे.
‘एफआयईओ’चे गुप्ता यांनी सांगितले की, आयात-निर्यात व्यवहारांचे र्सवकष डिजिटलायझेशन आणि ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे माल पाठवण्यास लागणारा वेळ तर वाचेलच, शिवाय त्यात येणारे अडथळे लक्षात येऊन मालाच्या जलद वाहतुकीसाठी उपाययोजना करता येईल. एकूण निर्यात खर्चात घट होऊन त्याचा फायदा जागतिक बाजारात स्पर्धेत टिकण्यासाठी होणार आहे.
- भारतातून निर्यात होणाऱ्या मत्स्य उत्पादनांत प्रामुख्याने गोठवलेली मासळी, कोळंबी यांचा समावेश होतो.
- जगात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादन करणारा देश आहे.
- जगातील एकूण मत्स्य उत्पादनापैकी ६.३ टक्के भारतात होते.
- भारतात १.४५ कोटी लोकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे.