आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या कंपन्यांनी भारतात कारखाने सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले. विशेषत: सौरऊर्जा क्षेत्रामध्ये, लिथियम बॅटरीच्या उत्पादनात, सेमी कंडक्टर्समध्ये तसेच लॅपटॉपसारख्या उपकरणांची भारतात मोठ्या प्रमाणावर निर्मिती व्हावी याला चालना देण्यात येणार आहे.

यासाठी या कंपन्यांना करांमध्ये भरीव सवलती देण्यात येत असल्याचे सीतारामन म्हणाल्या. याखेरीज भारत विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी ग्लोबल हब बनवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. सीतारमन म्हणाल्या की आधीच जीएसटी काऊन्सिलकडे असा प्रस्ताव देण्यात आला आहे की, इलेक्ट्रिक वाहनांसाठी जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करावा. याखेरीज विजेवर चालणारी कार विकत घेणाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. विजेवर चालणारी कार खरेदी केल्यास त्यासाठी घेतलेल्या कर्जावरील दीड लाखांपर्यंतच्या व्याजाला करवजावट मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या प्रस्तावांमुळे पर्यायी उर्जाक्षेत्राला तसेच विजेवर चालणाऱ्या वाहनक्षेत्राला चालना मिळणार असल्याचे दिसत आहे.

Story img Loader