दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकींचा सपाटा लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मागील काही दिवसांपासून भाजपा नेत्यांच्या बैठकी घेत असल्याने केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावं चर्चेत आहेत. उत्तर प्रदेश निवडणूकीबरोबरच महाराष्ट्रामधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रीमंडळामध्ये कोणाचा समावेश होऊ शकतो, यासंदर्भात काय शक्यता व्यक्त केल्या जात आहेत जाणून घेऊयात…

नारायण राणेंचं नाव आघाडीवर…

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सोमवारी दिल्लीला गेले असून राणे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राणे हे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या नड्डा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. नारायण राणे हे सध्या महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी आणि त्यातही खास करुन शिवसेनेचे सर्वात मोठे विरोधक मानले जात असल्याने त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नक्की पाहा >> “नाना पटोलेंनी देशाचा GDP मायनस सात केला”; नारायण राणेंचा व्हिडीओ व्हायरल

शाह यांनी केलेलं राणेंचं कौतुक…

७ फेब्रवारी रोजी खासदार नारायण राणे यांच्या लाइफ टाइम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ओरस पडवे येथे आले होते. या उद्घाटन प्रसंगी शाह यांनी दिलेल्या भाषणामध्ये राजकीय टोलेबाजी करण्याबरोबरच राणे यांचं कौतुकही केलं होतं. अनेकजण नारायण राणे यांच्या नेतृत्वासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मात्र जेव्हा मी नारायण राणे यांच्याकडे पाहतो तेव्हा मला त्यांच्यामध्ये जेथे जेथे अन्याय होतो तेथे ठामपणे भूमिका घेणारा आणि स्पष्टपणे बोलणारा नेता दिसतो, अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी नारायण राणेंचं कौतुक केलं होतं. पुढे बोलताना त्यांनी, सार्वजनिक आयुष्यामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं कारण जी व्यक्ती स्वत:विरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात लढू शकत नाही ती जनतेविरुद्धच्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाही असं म्हटलं होतं. जेव्हा जेव्हा नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं त्यांना वाटलं त्यांनी भविष्याचा जास्त विचार न करता त्या अन्यायाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळेच राणेंच्या राजकीय प्रवासामध्ये फार वळणं असल्याचं दिसून येतं , असं शाह म्हणाले होते.

नक्की वाचा >> नितीन गडकरींनी सांगितला YouTube वरुन होणाऱ्या कमाईचा आकडा; म्हणाले, “आज मला महिन्याला…”

नारायण राणेंवर तुमच्या पक्षाकडूनही अन्याय झाला तर काय करणार?, असा प्रश्न मला काही पत्रकारांनी विचारल्याचंही शाह यांनी या भाषणात म्हटलं. या प्रश्नाला उत्तर देताना, “मी त्यांना राणेंवर भाजपामध्ये अन्याय होणार नाही,” असं सांगितल्याचंही शाह यांनी नमूद केलं. भारतीय जनता पार्टीला नारायण राणेंसारख्या नेत्याला कशाप्रकारचा सन्मान द्यायचा आणि त्यांचा मान कसा राखायचा हे ठाऊक आहे असंही शाह यांनी यावेळी सांगितलं. भाजपा नारायण राणेंवर अन्याय करणार नाही. राणेंचा निश्चित सन्मान पक्षाकडून केला जाईल. तसेच कसा सन्मान करायचा याचा निर्णय पक्ष घेईल, असे अमित शाह यावेळी म्हणाले.

नारायण राणे यांनी २००५ साली उद्धव ठाकरेंशी असलेल्या मतभेदामुळे शिवसेना सोडून काँग्रेसमद्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी २०१७ साली स्वाभिमानी पक्षाची स्थापना केलेली. २०१८ साली भाजपाच्या पाठींब्याने ते राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये निलेश आणि नितेश या आपल्या दोन्ही मुलांसोबत भाजपामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. मागील काही काळापासून करोना परिस्थिती हाताळ्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याची टीका राणेंकडून केली जात आहे.

नक्की पाहा >> व्हायरल व्हिडीओ : मोदी चूकून म्हणाले, “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या” 

प्रितम मुंडेंनाही संधी मिळण्याची शक्यता…

नारायण राणेंप्रमाणे आणखीन एक नाव केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे ते म्हणजे बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे. दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असणाऱ्या प्रितम मुंडे या २०१४ साली मुंडेंच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच खासदार झालेल्या. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्येही त्यांचा विजय झाला.

स्थानिक निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाअंतर्गत २७ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केल्याने महाविकास आघाडीवर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रितम मुंडेंचा मंत्रीमंडळात समावेश करुन घेण्याचा विचार सुरु असल्याचे वृत्त आहे. राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसींसंदर्भातील अनेक महत्वाचे मुद्दे प्रितम मुंडे आणि त्यांची मोठी बहीण तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे वेळोवेळी मांडत असतात.

उदयनराजे भोसलेंच्या नावाचीही चर्चा…

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलन सुरु आहे. याच विषयावरुन राजकीय वाद निर्माण झालेला असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसलेंना भाजपा केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये संधी देण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असतानाच उदयनराजे आणि नारायण राणे या दोन मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सहभागी करुन घेतले जाऊ शकते.

नक्की वाचा >> मोदी 2.0 सरकार सर्वेक्षण : अबकी बार गडकरी… पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या मनात गडकरीच

२०१९ साली उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यामध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उदयनाराजेंचा पराभव झाला होता. नंतर उदयनराजेंना भाजपाने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं.

सध्या मोदी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील कोणते नेते?

सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे या भाजपाच्या नेत्यांबरोबरच रिपब्लिकन पार्टीच्या रामदास आठवले यांचाही समावेश आहे.

Story img Loader