पीटीआय, नवी दिल्ली
देशातील विरोधी पक्ष ‘नीट-यूजी’ परीक्षेबाबत खोटी माहिती पसरवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. विरोधकांनी आपले हे ह्यफसवणूक धोरणह्ण थांबवावे, असे आवाहन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी केले. या वेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाही चढवला.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सरकार सोडणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितले होते. याचाच आधार घेत प्रधान यांनी विरोधकांवर टीका केली आहे. काँग्रेसचा भूतकाळातील आणि सध्याच्या मुद्द्यावर देशाची फसवणूक करण्याचा इतिहास आहे त्यांचा हा हेतू ‘नीट’ प्रकरणातही उघडपणे समोर आला आहे. मुद्द्यांपासून विचलित होऊन अस्थिरता निर्माण करण्याचा ‘इंडिया’ आघाडीचा हेतू आहे, असा आरोप मंत्री प्रधान यांनी केला.
हेही वाचा >>>चंपई सोरेन यांचा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन तिसऱ्यांदा राज्याची सूत्रं हाती घेणार
युवा शक्ती आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य हे सरकारचे पहिले प्राधान्य आहे. हे सरकार देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी आहे. कोणावरही कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे प्रधान या वेळी म्हणाले. दरम्यान, नीट आणि नेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमधील पेपर फुटीसह कथित गैरव्यवहाराबद्दलच्या वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी या विषयावर संसदेत चर्चा करण्याची सरकारकडे मागणी केली आहे. तसे पत्रही विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.