वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेतील अनियमिततेवरून सुरू असलेला गदारोळ ताजा असतानाच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेतही (NET) अनियमतता आढळून आली आहे. याच कारणास्तव मंगळवारी (१८ जून) घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आली. परिक्षांमध्ये गडबड होत असल्याकारणाने देशभरातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होत आहेत. तसेच विरोधकांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. यानंतर आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करत असल्याचे जाहीर केले.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, परीक्षा प्रक्रियेत तसूभरही चूक होता कामा नये, असा आमचा प्रयत्न आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) कारभाराची चौकशी करण्यासाठी आम्ही आता उच्चस्तरीय समिती स्थापन करत आहोत. एनटीएचे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी ही समिती सरकारला शिफारस करेल.

कधी ‘नीट’ तर कधी ‘नेट’: परीक्षांमध्ये नेमका काय गोंधळ झालाय?

एनटीएमधील कोणताही व्यक्ती असो, तो दोषी आढळ्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही प्रधान म्हणाले. युजीसी नेटचा एक पेपर रद्द करण्यात आला होता. शिक्षण मंत्री प्रधान यांनी डार्कनेटवर पेपर फुटल्याचे मान्य केले. टेलिग्रामवरून पेपर व्हायरल झाल्याचेही त्यांनी सांगितले. हा व्हायरल झालेला पेपर परिक्षेच्या पेपरशी मिळता जुळता आहे.

धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले की, पाटण्यातून पेपरफुटीबाबत काही माहिती समोर येत आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. मी केंद्र सरकारकडून विश्वास देऊ इच्छितो की, जो कुणी पेपरफुटीमध्ये सहभागी आहे, मग ते स्वतः एनटीए असेल किंवा एनटीएमधील कुणीही मोठा व्यक्ती असेल त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.