केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोटात संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल
एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, अर्थमंत्री सीतारामन यांच्या पोटात हलकासा संसर्ग झाला होता. तसेच त्यांच्या नियमित तपासण्या देखील आज होणार होत्या. त्यामुळे त्यांना दिल्लीमधील एम्समध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
निर्मला सीतारामन यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. सीतारामन यांनी शुक्रवारीच वर्ष २०२३ च्या अर्थसंकल्पाबाबत एक बैठक घेतली होती. अर्थसंकल्प सादर करण्यासाठीचे नियोजन या बैठकीत करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांनी चेन्नई येथे डॉ. एमजीआर आरोग्य विद्यापीठाच्या ३५ व्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली होती. त्यानंतर काल रविवार रोजी त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील ‘सदैव अटल’ स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली होती.