नवी दिल्ली : देशात करोनाचे रुग्ण वाढत असून, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शुक्रवारी सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिवांची आढावा बैठक घेतली. करोना प्रतिबंधासाठी सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी राज्यांना केल्या.
फ्लूसदृश संसर्ग (आयएलआय) आणि गंभीर स्वरूपाचे तीव्र श्वसन संसर्ग (एसएआरआय) यामुळे होणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यांना दिल्या. करोनाचा प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी केंद्र – राज्यांना पूर्वीप्रमाणेच सहकार्याने काम करावे लागेल, याचीही मांडवीय यांनी जाणीव करून दिली. सध्या जागतिक आरोग्य संघटना विविध प्रकारच्या विषाणूंचा माग घेत आहे, अशी माहिती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
सूचना काय?
– चाचण्या, लसीकरण आणि रुग्णालयांच्या सुविधा सज्ज ठेवण्याचा वेग वाढवावा.
– करोना प्रतिबंधाबाबत जनजागृती करावी.
– रुग्णालयांमध्ये १० आणि ११ एप्रिलला ‘मॉक ड्रिल’ कराव्यात.
– जिल्हा प्रशासन, आरोग्य अधिकाऱ्यांनी ८ व ९ एप्रिलला रुग्णालयांच्या सज्जतेचा आढावा घ्यावा.
देशातील रुग्णवाढ, मृत्यू
देशात शुक्रवारी ६०५० नवे रुग्ण आढळले. गेल्या २०३ दिवसांतील ही सर्वाधिक संख्या आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या २८,३०३ झाली आहे. गेल्या २४ तासांत १४ बाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या एकूण करोना बळींची संख्या ५,३०,९४३वर पोहोचली आहे.
राज्यात ९२६ नवे रुग्ण
राज्यात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून, शुक्रवारी ९२६ रुग्णांची नोंद झाली. करोनामुळे गोंदिया, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मुंबईत दिवसभरात २७६ नवे रुग्ण आढळले. गुरुवारच्या तुलनेत शहरात २७ टक्के रुग्णवाढ झाली आहे. राज्यात गुरुवारी करोनाचे ८०३ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी त्यात आणखी वाढ नोंदविण्यात आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.