H9N2 Virus Update in Marathi : चीनमध्ये H9N2 चा प्रादुर्भाव वाढला असून तेथील लहान मुलांमध्ये श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. करोनाप्रमाणे हा सुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने भारतीय नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. परंतु, केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H9N2) चा भारताला कमी धोका असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचा आजार वाढला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन देखील जारी केले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
चीनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणू) चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आले. त्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. परिणामी, या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली चीनमध्ये नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला. आरोग्य संघटनेने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या H9N2 च्या मानवी प्रकरणांमध्ये मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असून मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. म्हणजेच, या आजाराचा संसर्गजन्य दर आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
हेही वाचा >> भारताच्या नेतृत्वात १४ देश चीनविरोधात एकवटले, ड्रॅगनसमोर आता मोठे आव्हान; काय आहे IPEF?
“भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य परिस्थितीसाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने एक समग्र आणि एकात्मिक रोडमॅपचा अवलंब करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे.
कोविड महामारीनंतर आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली आहे. पीएम-आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM-ABHIM) हे पंतप्रधानांनी सुरू केले होते. यामुळे आरोग्य प्रणाली तयार करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय श्रेणीतील सर्व स्तरांवर आरोग्य यंत्रणा आणि संस्थांची क्षमता विकसित करता येते.