नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे एका कार्यक्रमात केली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०० जागा जिंकेल असे भाकीत त्यांनी वर्तवले.
नागरिकत्व सुधारणा कायदा हा २०१९ मध्ये संसदेत संमत करण्यात आला आहे.
याबाबत अधिसूचना काढल्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजाणी केली जाईल असे त्यांनी नमूद केले. या संदर्भात मुस्लीम बांधवांची दिशाभूल करण्यात येऊन, त्यांना या कायद्याविरोधात चिथावणी देण्यात आल्याचा आरोप शहा यांनी केला. या कायद्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशात धर्माच्या आधारावर छळ झाल्याने भारतात आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध , शिख, पारशी तसेच ख्रिश्चनांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. यात कोणाचेही भारतीय नागरिकत्व हिरावून घेत नाही असे ते म्हणाले.