Amit Shah On Rahul Gandhi : सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त संसदेच्या सभागृहात चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवरच आज (१७ डिसेंबर) राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावर भाष्य केलं. दरम्यान, यावेळी बोलताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ५४ वर्षांचा युवा नेता असा उल्लेख करत खोचक टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित शाह यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटलं की, “आता असे काही नेते आहेत. जे ५४ वर्षांचे असूनही ते स्वतःला युवा नेते म्हणवतात. ५४ व्या वर्षी स्वत:ला तरुण म्हणवतात. ते फिरत राहतात आणि सत्ताधारी पक्ष राज्यघटना बदलेल, संविधान बदलेल अशी टीका करत राहतात. मात्र, मला त्यांना सांगायचं आहे की, घटनादुरुस्तीची तरतूद संविधानातच आहे”, असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

हेही वाचा : One Nation One Election : मोठी बातमी! भाजपा २० खासदारांना बजावणार नोटीस; नेमकं कारण काय?

अमित शाह यांनी पुढे बोलताना असाही दावा केला की, ‘कलम ३६८ मध्ये घटनादुरुस्तीच्या तरतुदी आहेत आणि काँग्रेस केंद्रात सत्तेत असताना त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने ७७ सुधारणा केल्या आणि भाजपाने १६ वर्षे सत्तेत असताना आम्ही राज्यघटनेत २२ सुधारणा केल्या. संविधानाचा सन्मान फक्त शब्दांत नाही तर कृतीत आदर केला गेला पाहिजे. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी संविधानाबाबत खोटं बोलून जनादेश घेण्याचा प्रयत्न केला. तसेच संविधानाची कोरी प्रत घेऊन फिरले. मात्र, लोकांनी तुमचा पराभव केला”, असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींसह विरोधकांवर जोरदार टीका केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union home minister amit shah congress leader rahul gandhi in parliament session politics gkt