Jharkhand Election 2024 : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. दोन्ही राज्याच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्याही सभांचा धडाका सुरु आहे. या सभांच्या माध्यमातून नेत्यांकडून जनतेला मोठी आश्वासनं देण्यात येत आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री अमित शाह यांची झारखंडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच झारखंडमधल्या घुसखोरांना हुडकण्यासाठी समिती स्थापण करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलं.
अमित शाह काय म्हणाले?
“झारखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला तर ते राज्यातील घुसखोरांना ओळखून त्यांना हुसकावून लावण्यासाठी एक समिती स्थापण करण्यात येईल. झारखंडमध्ये आदिवासींची लोकसंख्या कमी होत आहे. आमच्या मुलींचे लग्न लावून घुसखोर जमिनी बळकावत आहेत. घुसखोरांनी आदिवासी महिलांशी लग्न केल्यास त्या जमिनीचे हस्तांतरण रोखण्यासाठी आम्ही कायदा आणू. घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आम्ही एक समिती देखील स्थापन करू”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं दिलं आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऐन निवडणुकीत झारखंडमधील घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापलं आहे. तसेच चंपाई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यासंदर्भातही भाष्य करत अमित शाह यांनी हेमंत सोरेन यांच्यावर टीका केली.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आर्थीक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यानंतर ते काही दिवस तुरुंगात होते. ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी चंपाई सोरेन हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे चंपाई सोरेन यांनी नाराज होत पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, अमित शाह यांनी या सभेत बोलताना या सर्व घडामोडींवर भाष्य केलं.