CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेतला जाणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी महिनाभराचा कालावधी उरला असताना केंद्राने हा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. या संदर्भात उद्धव ठाकरेंनी जी टीका केली त्यानंतर उद्धव ठाकरेंना अमित शाह यांनी खुलं आव्हान दिलं आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी आक्रमक होत हे आव्हान दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले अमित शाह?

“सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. सहाव्या सूचीत जी क्षेत्रं आहेत तिथे सीएए लागू होणार नाही. कुणी तिथून अर्ज केला तरीही तिथून ते स्वीकारलं जाणार नाही. सीएए कायदा हा भारताचं नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांना कायदा नाकारण्याचा अधिकार नाही. कारण संसदेचा तो अधिकार आहे. हा विषय केंद्राचा आहे. केंद्र आणि राज्यांचा विषय नाही.” असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना आव्हान

उद्धव ठाकरे असं म्हणतात की तुमचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही हा कायदा आणला आहे. याबाबत विचारलं असता अमित शाह म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे हे मी आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावं की हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको. उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं आहे. राजकारण करु नका, मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे. “

ममता बॅनर्जींवर टीका

ममता बॅनर्जींना हात जोडून विनंती करतो आहे की राजकारण करण्यासाठी खूप सारे मार्ग आहे. बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंचं अहित करु नका. बांगलादेशातून जे बंगाली हिंदू आले आहेत त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आम्ही कायदा आणत आहोत. हिंदू-मुस्लिम यांच्यात विसंवाद निर्माण करुन ममता बॅनर्जी राजकारण करत आहेत. मला त्यांनी एक कायद्यातली एक तरतूद दाखवावी की जी नागरिकता हिरावून घेते. बंगालबाबत तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की लवकरच पश्चिम बंगालमध्येही लवकरच भाजपाचं सरकार येईल. ममता बॅनर्जी घुसखोरीचं समर्थन करणार असतील तर तिथे त्यांचं सरकार राहणार नाही असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister amit shah challenges uddhav thackeray about caa scj
Show comments