नवी दिल्ली : सरकार आणि समाज यांच्यात विश्वास निर्माण करणे हा प्रशासनाचा मूळ उद्देश आहे. ही शासन व्यवस्था आमच्यासाठी कार्य करेल, आम्हाला पाठिंबा आणि न्याय देईल, असा विश्वास नागरिकांना देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी केले.
नवी दिल्ली येथे ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स अवॉर्ड्स’च्या तिसऱ्या आवृत्तीत केंद्रीय मंत्री वैष्णव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘जिल्हाधिकारी (डीएम) ही खरोखर एक संस्था असून, नागरिकांचा त्या पदावर असलेल्या व्यक्तीवर खूप विश्वास असतो आणि त्यांच्याकडून अपेक्षाही असतात. नागरिक तुम्हाला संस्था म्हणून ओळखतात, तेव्हा जबाबदारीची भावनाही मोठी असते,’ असे वैष्णव यांनी अधोरेखित केले.
ओडिशा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी असलेल्या वैष्णव यांनी बालासोर आणि कटक येथील जिल्हाधिकारी पदावरील अनुभवांचे कथन केले. १९९९च्या चक्रीवादळाबद्दल बोलताना ते म्हणाले की, बालासोरचा जिल्हाधिकारी असताना, हवामान खात्याकडे इतकी अचूकता नव्हती. त्यावेळी नासाच्या संगणकावरून माहिती गोळा केल्यानंतर एक मोठी आपत्ती येणार असल्याचे लक्षात आले, तेव्हा लोकप्रतिनिधींबरोबर बसून स्थलांतराबाबत स्पष्ट कृती आराखडा तयार केला आणि अनेकांना वाचविले, अशी विशेष आठवण वैष्णव यांनी सांगितली.
तत्पूर्वी, पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी एकात्मतेचे महत्त्व या वेळी अधोरेखित केले. ‘एकात्मता केवळ बोलण्यापुरता नसावी, तर ती आचरणातही आणणे आवश्यक आहे.’ सार्वजनिक तसेच राजकीय जबाबदाऱ्यांमध्ये संतूलन राखल्याबद्दल डॉ. सिंह यांनी विद्यामान नागरी सेवकांचे या वेळी कौतुक केले.
पुरस्कार सोहळ्याला काँग्रेसचे मनीष तिवारी, भाकपचे डी. राजा, भाजपचे अनिल बलुनी, जद(यू)चे केसी त्यागी, माजी केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण सचिव व्ही. श्रीनिवास, राजदूत आणि कायदेतज्ज्ञ उपस्थित होते. या वेळी समाजकल्याण ते कृषी, शिक्षण ते तंत्रज्ञान अशा १६ श्रेणींमध्ये देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. ४५० हून अधिक प्रवेशिकांमधून ज्युरींद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली.
क्षमता ओळखण्यास मदत
‘द इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक राजकमल झा म्हणाले, ‘राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येक पुरस्कार विजेत्याने नागरी समूदायाला सक्षम करण्यासाठी भावनेचा विस्तार केला आहे. तसेच त्यांच्यातील क्षमता ओळखण्यास मदत केली आहे.
‘सार्वजनिक सेवेत महत्त्वाची भूमिका’
‘आज आपण अनुभवत असलेली सार्वजनिक सेवा, ज्याचे लाभार्थी पक्ष आणि एकात्मतेच्या विभाजन रेषा ओलांडून जातात, आपल्यातील अविश्वास आणि निराशा दूर करण्यात एक मजबूत भूमिका बजावत असल्याचे ‘एक्स्प्रेस समूहा’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक गोएंका या वेळी म्हणाले. पुरस्कार विजेते जिल्हा दंडाधिकारी गरजू नागरिकांपर्यंत स्वातंत्र्य, प्रशासन आणि विकासाचे फायदे पोहोचवतात. ते लोकशाहीला सुरक्षित ठेवून तीचे संवर्धन करतात, असेही त्यांनी नमूद केले.