आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. इफ्तार पार्ट्या करणे ही नौटंकी असल्याचे गिरीराज सिंह यांनी एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. यासंदर्भातला व्हिडीओच एएनआयने ट्विटरवर पोस्ट केला आहे. रमजान ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. मात्र मला इफ्तार पार्ट्यांची नौटंकी करायची गरज वाटत नाही असे वादग्रस्त वक्तव्य गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले आहे.

मुस्लिम समाजाकडे व्होट बँक म्हणून पाहिले जाते. त्याचमुळे या समाजाचे लांगुलचालन करण्यासाठी नेते टोप्या घालून इफ्तार पार्ट्यांची नौटंकी करताना दिसतात असेही सिंह यांनी म्हटले आहे. ज्यादिवशी भारतातले हिंदू व्होट बँक होतील तेव्हा हेच नेते कपाळावर भस्म आणि चंदनाचे लेप लावून हिंदू धर्माचे सण साजरे करताना दिसतील आणि त्याचसोबत हिंदू समाजाला मतांचा जोगवा मागतील असेही मत गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर भारतातल्या हिंदू समाजाला एकमेकांपासून वेगळे करून टाकले आहे. त्यांच्यात दुही पसरवली आहे. हिंदूंकडे व्होट बँक म्हणून पाहिले जात नाही. त्याचमुळे देशात मुस्लिमांचे लांगुलचालन केले जाते आणि इफ्तार पार्ट्यांमध्ये नेतेमंडळी टोप्या घालून सर्वधर्मसमभाव जपण्याचा संदेश देताना दिसतात अशी टीका गिरीराज सिंह यांनी केली आहे.

गिरीराज सिंह यांची जीभ घसरण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी ‘देशातल्या मुलींना सुरक्षित ठेवायचे असेल तर दोनच अपत्ये जन्माला घाला’, ‘हिंदूंची लोकसंख्या वाढली नाही तर राममंदिर कसे उभारणार?’, ‘नोटाबंदीनंतर केंद्राने नसबंदीचा निर्णय घ्यावा’, ‘सोनिया गांधी गोऱ्या नसत्या तर काँग्रेसने त्यांना स्विकारले असते का?’, ‘राज ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले’ ‘पत्नी आणि बहिणीमध्ये जो फरक असतो तोच गोमांस इतर मांसामध्ये असतो’ ही आणि अशी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची अनेकदा कानउघडणीही केली आहे.

पालथ्या घड्यावर पाणी ही म्हण गिरीराज सिंह यांच्याबाबतीत तंतोतंत खरी ठरताना दिसते आहे. कारण ते काही आपल्या जीभेवर ताबा ठेवायला तयार नाहीत. गिरीराज सिंह वादग्रस्त वक्तव्ये करतात. त्यानंतर आपला माफीनामा सादर करतात. मग काही दिवस शांत राहतात. त्यानंतर पुन्हा तोल सोडून वाट्टेल ते बरळतात. आता त्यांच्या इफ्तार पार्टी म्हणजे नौटंकी या वक्तव्यामुळेही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Story img Loader