नितीन गडकरी आणि किस्से यांचं एक वेगळंच नातं गेल्या काही वर्षांत पाहायला मिळालं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये नितीन गडकरी यांच्या आयुष्यात घडलेले किस्से सांगताना दिसतात. मुंबईत शुक्रवारी झालेल्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन हायवे’ या परिषदेमध्ये देखील नितीन गडकरींचा हाच ‘किस्सेदार’ स्वभाव पाहायला मिळाला. यावेळी गडकरींनी १९९५-९६ सालात सार्वजनिक क्षेत्रातून निधी उभा करण्यासंदर्भात त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. तेव्हा रतन टाटा यांच्यासोबत घडलेला एक किस्सा गडकरींनी सांगितला.
टाटा म्हणाले, “आम्हाला कुणालाच अपेक्षा नव्हती”
१९९६ साली घडलेल्या या प्रसंगाची आठवण करून देताना नितीन गडकरी यांनी रतन टाटांनी त्यांच्या केलेल्या कौतुकाविषयी सांगितलं. “जेव्हा पहिल्यांदा ५०० कोटी रुपयांसाठी १९९६ मध्ये आम्ही कॅपिटल मार्केटमध्ये गेलो, तेव्हा १ हजार १६० कोटी रुपये बॉण्ड्समध्ये मिळाले. लोकांनी अतिरिक्त बॉण्ड्स खरेदी केले. दुसऱ्यांदा ६५० कोटींसाठी गेलो, तेव्हा पुन्हा ११०० कोटी बॉण्ड्सच्या रुपात मिळाले. तेव्हा रतन टाटा मला म्हणायचे, तुम्ही आमच्यापेक्षा हुशार निघालात. कारण आम्हाला कुणालाच अपेक्षा नव्हती की एवढा पैसा लोकांकडून इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी येईल”, असं गडकरी म्हणाले.
२०१४पूर्वी प्रकल्प रखडायचे कारण..
दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरींनी २०१४ पूर्वी सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातले प्रकल्प का रखडायचे, याचं कारण सांगितलं. “याआधी २०१४ पूर्वी असे प्रकल्प रखडायचे कारण तेव्हा जमीन अधिग्रहणाच्या बऱ्याच अडचणी उभ्या राहायच्या. पण नंतर आम्ही ठरवलं की जोपर्यंत प्रकल्पासाठीच्या ९० टक्के जमिनीचं अधिग्रहण होत नाही, तोपर्यंत प्रकल्प करायला द्यायचाच नाही. पर्यावरणविषयक मंजुऱ्या देखील आधीच घेण्याचा शिरस्ता घातला. त्यामुळे प्रकल्प रखडण्याच्या अनेक समस्या आता सुटल्या आहेत”, असं गडकरींनी या परिषदेत आलेल्या गुंतवणूकदारांना सांगितलं.
३६०० कोटींचा प्रकल्प फक्त १६०० कोटींमध्ये पूर्ण!
यावेळी सार्वजनिक क्षेत्रातून उभ्या केलेल्या निधीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या बांधकामामध्ये सरकारचे २ हजार कोटी कसे वाचले, हे देखील गडकरींनी सांगितलं. “रिलायन्सनं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसाठी ३६०० कोटींची निविदा सादर केली होती. आम्ही ती फेटाळली आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून तो प्रकल्प अवध्या १६०० कोटींमध्ये पूर्ण केला. २ हजार कोटी रुपये आम्ही वाचवले. नंतर राज्य सरकाने तो मोनेटाईज करून त्यातून ३००० हजार कोटी मिळवले. दीड वर्षापूर्वी आम्ही तो पुन्हा मोनेटाईज केला आणि त्यातून ८ हजार कोटी मिळाले”, असं गडकरी म्हणाले.
यावेळी नितीन गडकरींनी गुंतवणूकदारांना देशातील इन्फ्रास्ट्र्क्चर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन देखील केलं.