Nityanand Rai Nephew Shot Dead : केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या भाच्याची गुरूवारी त्याच्यात भावाने गोळी घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील नवगछियाच्या जगतपूर गावात त्यांच्या घरातील पाण्याच्या नळावरून झालेल्या वादानंतर दोन भावांनी एकमेकांवर गोळीबार केला. या गोळीबारात या दोघांची आई देखील जखमी झाली आहे.
“प्राथमिक तपासात असे दिसून आले की दोन भावांमध्ये पाण्याच्या नळावरून वाद सुरू झाला, जो खूपच वाढला आणि अखेर दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला. यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विश्वजीत यादव असून जयजित हा जखमी झाला आहे आणि त्याला प्रगत उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. काडतूसाचे शेल आणि जिवंत काडतूसे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत,” अशी माहिती नवगछियाच्या एसपी प्रेरणा कुमारी यांनी दिली आहे.
नेमकं झालं काय?
गुरूवारी सकाळी नळावरून पाणी भरण्याच्या मुद्द्यावर विश्वजीत आणि जयजित या दोन भावांच्या पत्नींमध्ये वादाला सुरूवात झाली, अशी माहिती परबट्टाचे एसएचओ शंभू पासवान यांनी दिली.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयजित याने पाण्याचा नळ त्याचा असल्याचे मुद्दा उपस्थित करत विश्वजीत याला पाणी भरण्यापासून रोखले. हा वाद पुढे हाणामारीवर आला ज्यादरम्यान विश्वजीतने जयजित याच्यावर गोळी झाडली, मात्र जयजितने त्याची बंदुक हिसकावून घेत त्याच्यावरच गोळीबार केला. त्यांची आई हिना देवी या दोघा भावंडांमधील भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना देखील हाताला गोळी लागली आहे.
या तिघांनाही ताबडतोब भागलपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे पोहचताच विश्वजीत याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान अधिकार्यांनी सांगितलं की, “जयजितची प्रकृती गंभीर असून त्याला प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी पुढे पाठवण्यात आले आहे.” या घटनेनंतर प्रशासनाकडून जयजित याच्या गुन्हेगारी रेकॉर्डचा तपास केला जात आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे भाऊ एकाच घरात राहत होते आणि त्यांच्यात अनेक दिवासांपासून वाद सुरू होता.