गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांबाबत आता केंद्र सरकारची भूमिका गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी स्पष्ट केली आहे. आता यापुढे दहशतवाद्यांना दोनच पर्याय असतील एक तर तुरुंगात पाठवले जाईल किंवा ते नरकात जातील, असा इशारा गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ले वाढले असून त्यामध्ये काही भारतीय जवानही शहीद झाले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. संसदेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांबाबत काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी प्रश्न विचारला असता त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हा इशारा देत दहशतवादी कारवाया लवकरच थांबतील, असं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, मोदी सरकार कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेणार नाही. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात सुमारे ९०० दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : Abhishek Banerjee : “भाजपा खासदार नेहरूंवर बोलले की चालतं पण आम्ही नोटबंदीवर बोललं की..” अभिषेक बॅनर्जींचा सभापतींना खोचक प्रश्न

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं की, केंद्र सरकार दहशतवाद्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही. गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये २८ दहशतवादी मारले गेले आहेत आणि दुर्दैवाने काही सुरक्षा जवानांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, मोदी सरकार दहशतवाद कधीही खपवून घेणार नाही. दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडू नयेत. पण यावरून राजकारणही होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण हे दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचं असून दहशतवादी एकतर तुरुंगात राहतील किंवा नरकात जातील, असं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nityanand rai on terrorist attack in jammu kashmir only two options for terrorists gkt