कोणतीही प्रवासी भाडेवाढ नाही, नव्या गाडय़ांची घोषणा नाही की भेदाभेद नाही.. प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ, सुरक्षा व तांत्रिक विकासाला प्राधान्य देत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी मोदी सरकारचा पहिलावहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. कोणताही बडेजाव नसलेल्या या अर्थसंकल्पात ‘आपला प्रवास सुखाचा होवो’ ही सदिच्छाच प्रभू यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. प्रभू यांनी प्रवासी केंद्रबिंदू मानून रेल्वेस्थानक स्वच्छता, रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण, प्रवासी विशेषत: महिला सुरक्षा व तंत्रज्ञानाच्या वापरावर आगामी वर्षभरात भर देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. रेल्वे भाडेवाढ न झाल्याने कोटय़वधी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अर्थात कोणत्याही राज्यासाठी नव्या रेल्वेगाडीची घोषणा करण्याचे टाळल्याने प्रभू यांनी विरोधीच नव्हे तर स्वपक्षीय खासदारांची नाराजी ओढवून घेतली. मात्र या अधिवेशनाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने नव्या रेल्वे गाडय़ांची घोषणा करण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले. पुढील पाच वर्षांत रेल्वेत सुमारे ८ लाख ५६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सूतोवाच केले. सध्या खडखडाट असलेल्या रेल्वेच्या तिजोरीत सार्वजनिक भागीदारीतून कोटय़वधींचा निधी जमा होईल. रेल्वे खात्याची श्वेतपत्रिका, अर्थसंकल्प व रेल्वे व्हिजन २०३० असे रेल्वेच्या विकासाचे तीन टप्पे प्रभू यांनी निश्चित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा