आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काही जण जगावेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मग ते चुकीचं असलं तरी कुठलाच विचार करत नाहीत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील शिकागोमध्ये घडला. एका प्रवाशाने अचानक विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि विमानाच्या पंखांवर चालू लागले. मात्र घटनेवेळी विमान धावपट्टीवरच होते. विमान शिकागोच्या ओ हारे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल असून हा प्रवाशी कॅलिफोर्नियाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. शिकागो पोलीस विभागाच्या माहितीनुसार, “एक व्यक्ती विमानात होता तो गेटजवळ आला आणि त्याने आपत्कालीन दरवाजा उघडला आणि विमानाच्या पंखांवर चालू लागला. त्याला विमानाच्या पंखांवर चालताना पाहून विमानात बसलेले इतर प्रवासीही घाबरले होते.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रँडी फ्रँक डेव्हिला असे या प्रवाशाचे नाव आहे. या प्रवाशावर निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्रवासी युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाइट २४७८ मध्ये होते आणि सेनडियागो येथून आला होता.

युनायटेड एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ग्राउंड क्रूने या प्रवाशाला बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. विमान गेटजवळ पोहोचल्यावर इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आरोपीला २७ जून रोजी न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. विमानाची सेवा खंडित केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाश आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये, विमान हवेत असताना एका अमेरिकन एअरलाइन्सच्या प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता.

Story img Loader